भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात, अत्याधुनिक एमके-III हेलिकॉप्टरच्या तुकडीचा समावेश

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

चेन्नई/प्रतिनिधी – तटरक्षक दलाच्या पूर्वेकडच्या प्रदेशातील 840 स्क्वाड्रनला आणखी सामर्थ्य प्रदान करण्यासाठी  वजनाने हलक्या असलेल्या अत्याधुनिक(एएलएच)  एमके-III हेलिकॉप्टरच्या तुकडीचा चेन्नई येथील तटरक्षक दलाच्या हवाई तळावर तटरक्षक दलाचे महासंचालक व्ही एस पठानिया यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर 2022 रोजी समावेश करण्यात आला. या तुकडीचा समावेश म्हणजे सरकारच्या आत्मनिर्भर भारत या दृष्टीकोनाला अनुसरून हेलिकॉप्टर निर्मितीच्या क्षेत्रातील स्वयंपूर्णतेमध्ये घेतलेली मोठी झेप आहे. यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या अतिशय संवेदनशील सागरी क्षेत्रात भारतीय तटरक्षक दलाच्या क्षमतेला आणखी बळकटी मिळाली आहे. 

एएलएच एमके-III या हेलिकॉप्टरचे उत्पादन संपूर्णपणे देशी बनावटीने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून करण्यात आले असून त्यामध्ये अत्याधुनिक रडार प्रणाली आणि इलेक्ट्रो ऑप्टिक सेन्सर्ससह अत्याधुनिक सामग्री, शक्ती इंजिन्स, पूर्णपणे काचेचे कॉकपिट(वैमानिक कक्ष), उच्च संवेदी सर्च लाईट, अत्याधुनिक संपर्क प्रणाली, स्वयंचलित ओळख प्रणाली त्याचबरोबर सर्च ऍन्ड रेस्क्यू होमर अशा प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ठ्यांमुळे  जहाजांवरून परिचालन करताना दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळी हे हेलिकॉप्टर सागरी बचाव मोहीमा त्याचबरोबर दूर अंतरापर्यंत शोध आणि बचाव कार्य करण्यात सक्षम आहे.  

हेवी मशिनगनसह असलेल्या या  हेलिकॉप्टरचा वापर आक्रमणांसाठीचे साधन म्हणून करण्यासोबतच  वैद्यकीय अतिदक्षता उपकरणांसह गंभीर रुग्णांची ने आण करण्यासाठी देखील करता येऊ शकतो. भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण 16 एएलएच एमके-III हेलिकॉप्टर्स टप्प्याटप्पाने समाविष्ट करण्यात आली  असून त्यापैकी चार हेलिकॉप्टर चेन्नई येथे तैनात करण्यात आली आहेत. समावेशानंतर या तुकडीने 430 तासांपेक्षा जास्त हवाई उड्डाणे केली आहेत आणि अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला आहे.  

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web