नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – ‘जनजाती अनुसंधान – अस्मिता, अस्तित्व एवम् विकास’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या प्रतिनिधींनी आज म्हणजे 28 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान यांच्याकडून राष्ट्रपतींना ‘स्वतंत्रता संग्राम मे जनजाती नायकों का योगदान’ या पुस्तकाची पहिली प्रतही सादर करण्यात आली.
त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, तंत्रज्ञान आणि परंपरा तसेच आधुनिकता आणि संस्कृती यांची सांगड घालणे ही काळाची गरज आहे. आपण ज्ञानाच्या बळावर जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज असले पाहिजे. आदिवासी समाजाच्या ज्ञानाचा विकास भारताला ज्ञान-महासत्ता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
आपला इतिहास आणि परंपरा समजून घेण्यासाठी तरुणांना प्रेरणा मिळत असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. आपल्या समाजाच्या इतिहासाची आणि संस्कृतीची वैशिष्टय़े यावर संशोधन आणि लेखन करण्याकडे तरुणांचा कल असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास, देशाच्या आणि समाजाच्या समृद्धीची स्वप्ने आपल्या तरुणांनी समजून घेतली आणि ही स्वप्ने साकार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तरच भारताची प्रगती होऊ शकते, असे त्या म्हणाल्या.
आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी नेत्यांचे योगदान, चर्चासत्र इत्यादी फोटो प्रदर्शनांसह – प्रमुख विद्यापीठांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राष्ट्रपतींनी राष्ट्रीय अनुसूचित जमातीं आयोगाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की या कार्यक्रमांमुळे आदिवासी तरुणांचा त्यांच्या पूर्वजांच्या बलिदानाचा आणि त्यांच्या समाजाच्या स्वाभिमानाच्या महान परंपरेचा अभिमान वाढेल.
आपल्या देशातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या 10 कोटींहून अधिक आहे, याकडे लक्ष वेधून राष्ट्रपती म्हणाल्या की, विकासाचे फायदे या सर्वांपर्यंत पोहोचणे आणि त्याच वेळी त्यांची सांस्कृतिक ओळख अबाधित राहणे, हे त्यांच्यासमोर आव्हान आहे. याशिवाय त्यांच्या विकासासाठी चर्चा आणि संशोधनात त्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे.
‘स्वतंत्रता संग्राम मी जनजाती नायकों का योगदान’ हे पुस्तक प्रकाशित करणे हा एक चांगला उपक्रम आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. या पुस्तकाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या संघर्षाच्या आणि बलिदानाच्या कथा देशभरात मोठ्या प्रमाणावर पोहोचवल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.