स्वच्छताकर्मीनाही आता आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबई शहर स्वच्छतेमध्ये सतत मानांकन उंचावत राहिले असून यावर्षी देशात तृतीय क्रमांकाचे शहर म्हणून नावाजले गेले आहे. या मानांकनात सर्वात महत्वाचे योगदान स्वच्छताकर्मीचे असून ‘निश्चय केला नंबर पहिला’ हे आपले ध्येय साध्य करण्यासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ ला सामोरे जाताना आणखी जोमाने काम करूया असे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी केले. नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत आयोजित सफाईमित्रांना (फ्रंट वर्कर) आपत्तीविषयक विविध बाबींचे प्रशिक्षण या वेळी देण्यात आले.

याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, वैद्यकिय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड, अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव, अग्निशमन केंद्र अधिकारी अरुण भोईर व श्री. व्हि.डी कोळी आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आपत्ती धोके प्रतिबंध विषयावर म्हणजेच आग, भूकंप, रासायनिक आपत्ती बाबात ध्वनीचित्रफितीव्दारे जनजागृती, दैनंदिन जीवनात येणा-या विविध आपत्तींवर मात करण्यासाठी मार्गदर्शन, मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यादृष्टीने ऑनलाईन आरटीई प्रवेश प्रणालीबाबतचे मार्गदर्शन, मातृत्व शिशू जननी सुरक्षा योजनेबाबत मार्गदर्शन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी बेलापूर विभागातील 17 व नेरूळ विभागातील 13 अशा 30 गटांना प्रशिक्षण देण्यात आले. अग्निशमन प्रतिबंधक करावयाच्या उपाययोजना त्याचप्रमाणे वैद्यकिय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे यांनी राईट टू एज्युकेशन या विषयाची माहिती दिली व उपस्थितांशी संवाद साधत त्यांचे शंकानिरसन केले. अधिक्षक रवी जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी अग्निशमन अधिकारी यांनी अग्निशमन विषयक प्रात्यक्षिकेही करून दाखविली. उर्वरित सहा विभाग कार्यालयांतील गटांचे प्रशिक्षण दि. 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2022 रोजी सकाळ व दुपार अशा 2 सत्रांत विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web