बातम्यांच्या प्रसारणात वेगापेक्षा अचूकता महत्त्वाची – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – “विश्वसनीय  बातमी  सादर करणे ही माध्यमांची मुख्य  जबाबदारी असून बातम्यांच्या माध्यमातून दिली जाणारी माहिती  सार्वजनिकरित्या प्रसारित करण्यापूर्वी  वस्तुस्थिती योग्यरित्या तपासली पाहिजे”, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री   अनुराग ठाकूर यांनी आज सांगितले.

आशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियनची सर्वसाधारण सभा  2022 च्या उद्घाटन समारंभात अनुराग ठाकूर बोलत होते. “बातमी ज्या वेगाने प्रसारित केली जाते ते महत्त्वाचे आहेच मात्र ती प्रसारित करताना अचूकता अधिक महत्वाची आहे आणि बातमी देणाऱ्याने हे  प्राधान्याने  लक्षात ठेवायला  हवे” असे त्यांनी सांगितले. समाजमाध्यमांच्या विस्तारामुळे , खोट्या बातम्याही प्रसारित होत आहेत असे सांगत यादृष्टीने असत्यापित दावे खोडून काढत लोकांसमोर सत्य मांडण्यासाठी सरकारने तत्परतेने  भारत सरकारच्या पत्रसूचना कार्यालयामध्ये फॅक्ट चेक कक्षाची स्थापना केली, अशी माहिती मंत्र्यांनी आशिया-प्रशांत प्रदेशातील प्रसारकांच्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना दिली.

लोकांचा विश्वास कायम राखणे हे जबाबदार माध्यम संस्थांसाठी सर्वोच्च मार्गदर्शक तत्त्व असायला हवे, हे  केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी अधोरेखित केले. नेहमीच  सत्याच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल आणि  सत्य वृत्तांकनासाठी  लोकांचा विश्वास जिंकल्याचे श्रेय त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणी या प्रसारकांना दिले. संकटाच्या काळात माध्यमांची भूमिका महत्त्वाची बनते कारण ती थेट जीव वाचवण्याशी संबंधित असते हे अधोरेखित करत   राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनांमध्ये प्रसारमाध्यमांचे  महत्वाचे स्थान असल्याचे   त्यांनी सांगितले.

कोविड  19 महामारीच्या काळात घरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी   दिलेल्या योगदानाचे श्रेय माध्यमांना देत माध्यमानी लोकांना बाह्य जगाशी जोडले असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. भारतीय प्रसारमाध्यमांनी आणि विशेषकरून दूरदर्शन आणि आकाशवाणीने केलेल्या  उत्कृष्ट कार्याची माहिती मंत्र्यांनी दिली. दूरदर्शन आणि आकाशवाणीने सार्वजनिक सेवेच्या जनादेशाची  अतिशय समाधानकारकपणे पूर्तता केली   आणि महामारीच्या काळात लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. भारतीय माध्यमांनी सर्वसाधारणपणे कोविड-19 जागरूकता संदेश, महत्त्वाची सरकारी मार्गदर्शक तत्त्वे आणि डॉक्टरांशी मोफत ऑनलाइन सल्ला देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येकापर्यंत पोहोचेल हे सुनिश्चित केले, असे ते म्हणाले. प्रसार भारतीने कोविड 19 मुळे शंभरहून अधिक जणांना  गमावले तरीही या संस्थेचे  सार्वजनिक सेवा प्रसारणाचे काम सुरूच राहिले,  असे मंत्री म्हणाले.

“माध्यमांनी सरकार आणि लोक यांच्यातील दुवा म्हणून काम केले पाहिजे आणि राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर सतत प्रतिसाद  द्यायला हवे .” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा या व्यासपीठावरून पुनरुच्चार करत ठाकूर यांनी माध्यमांना प्रशासनात भागीदार होण्यासाठी आमंत्रित केले .  प्रसारण संस्थांची संघटना म्हणून एबीयू म्हणजेच आशिया -पॅसिफिक ब्रॉडकास्टींग यूनियनने माध्यमकर्मींना  प्रशिक्षित करणे आणि त्यांना संकटाच्या काळातील माध्यमांच्या भूमिकेबद्दल सर्वोत्तम व्यावसायिक कौशल्यांनी सुसज्ज करणे आवश्यक आहे आणि भारत अशा सर्व प्रयत्नांसाठी  तयार असल्याचे आश्वासन अनुराग ठाकूर यांनी यावेळी दिले.

एबीयू (आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन) सदस्यांसोबत असलेले भारताचे सहकार्य आणि भागीदारी यावरही त्यांनी चर्चा केली. प्रसारण उद्योगाच्या विविध पैलूंचा समावेश असलेले  प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने, प्रसार भारतीची सर्वोच्च प्रशिक्षण संस्था, नॅशनल अकॅडमी ऑफ ब्रॉडकास्टिंग आणि मल्टीमीडिया, ( एन ए बी एम)  एबीयू मीडिया अकादमीशी सहकार्य करत आहे, असे ते म्हणाले. आशयाची देवाणघेवाण, सह-निर्मिती, क्षमता बांधणी, इत्यादी क्षेत्रात भारताने  40 देशांसोबत द्विपक्षीय करार केले असून त्यात  ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, फिजी, मालदीव, नेपाळ, दक्षिण कोरिया, थायलंड आणि व्हिएतनाम अशा अनेक  एबीयू सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे.

“मार्च 2022 मध्ये आम्ही प्रसारण  क्षेत्रात ऑस्ट्रेलियासोबत एकमेकांच्या कार्यक्रमांशी संबंधित भागीदारी केली आहे.  विविध शैली आणि प्रकारच्या  कार्यक्रमांचे   संयुक्त प्रसारण आणि सहनिर्मितीसाठी दोन्ही देशातील प्रसारक संधींचा शोध घेत आहेत. “असे त्यांनी सांगितले.

आशिया पॅसिफिक क्षेत्रात एबीयू ची महत्वपूर्ण भूमिका   मसागाकी यांनी यावेळी  विशद केली  आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या  बातम्या आपापसात सामायिक करण्यासाठी या प्रदेशातील सर्व सार्वजनिक सेवा प्रसारकांनी केलेल्या सक्रिय प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.

आशिया प्रशांत क्षेत्र विविधतेने समृद्ध असले तरी आपण सर्व सदस्य राष्ट्रांना यात एकसमानता दिसून येते आणि समृद्ध विविधतेतील खऱ्या एकतेचे दर्शन होते, असे जावद मोटाघी म्हणाले. दूरचित्रवाणी आणि रेडिओ प्रसारकांच्या  सामूहिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी  आणि प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एबीयू च्या भूमिकेचे   प्रसार भारतीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, यांनी आपल्या स्वागतपर भाषणात कौतुक केले.

भारताची सार्वजनिक सेवा प्रसारक,  प्रसार भारती, 59 व्या  एबीयू 2022 सर्वसाधारण सभेचे आयोजन करत आहे. ” लोकांची सेवा, संकटकाळात माध्यमांची भूमिका’  ही यावर्षीच्या सभेची संकल्पना आहे.  नवी दिल्ली येथे आज  माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते सर्वसाधारण सभेचे उद्घाटन झाले.  यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा,  एबीयू चे अध्यक्ष मासागाकी सतोरू आणि सरचिटणीस  जावद मोटाघी उपस्थित होते.  एबीयू (आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन) ही आशिया आणि प्रशांत क्षेत्रातील प्रसारण संस्थांची ना नफा तत्वावर चालणारी व्यावसायिक संघटना आहे. सुमारे 50 संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे 40 देशांतील 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web