पद्मश्री दीपा मलिक बनल्या नि-क्षय मित्र आणि क्षयरोगमुक्त भारत मोहिमेच्या राष्ट्रीय सदिच्छा दूत

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – पद्मश्री, खेलरत्न अर्जुन आणि देशाच्या पहिल्या महिला पॅरालिंपिक पदकविजेत्या आणि भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्ष डॉ.(मानद) दीपा मलिक यांनी क्षयरोगमुक्त भारत मोहिमेच्या राष्ट्रीय सदिच्छा दूत आणि नि-क्षय मित्र बनून या मोहिमेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये सुरू केलेल्या क्षयरोगमुक्त भारत या मोहिमेसोबत आपली वचनबद्धता व्यक्त करण्यासाठी दीपा मलिक यांनी नवी दिल्लीत प्रगती मैदानात सुरू असलेल्या 41व्या इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेयर(आयआयटीएफ)मधील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या दालनाला भेट दिली आणि क्षयरोग जागरुकता उपक्रमांमध्ये सहभागी झाल्या. नि-क्षय मित्र बनून त्यांनी या मोहिमेला आपले आणखी जास्त पाठबळ दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती. क्षयरोगाची लागण झालेल्या रुग्णांना पोषण, अतिरिक्त निदान आणि  व्यावसायिक पाठबळ या तीन पातळ्यांवर या उपक्रमांतर्गत मदत दिली जाते. त्यांनी स्वतः एक नि-क्षय मित्र बनून स्वतः 5 क्षयरुग्णांच्या उपचारांची जबाबदारी स्वीकारली आहे आणि या योजनेत नोंदणी करण्यासाठी लोकांना प्रेरणा दिली आहे. या रोगाविषयीचे गैरसमज बाजूला ठेवून, जनजागृती करून आणि मदत देऊन प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार या मोहिमेत सहभाग घेतला तर भारत लवकरच क्षयरोगावर मात करू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

क्षयरोगमुक्त भारत या मोहिमेला दिलेल्या पाठबळाबाबत बोलताना डॉ. (मानद) दीपा मलिक म्हणाल्या, “ क्षयरोगमुक्त भारत लोकचळवळीमध्ये राष्ट्रीय सदिच्छा दूत बनून सहभागी होताना मला आनंद होत आहे आणि व्यक्तीला दुर्बल करणाऱ्या  आणि सहजतेने टाळता येऊ शकणाऱ्या आणि पूर्णपणे बरे होणे शक्य असलेल्या या आजाराविषयी आवश्यक असलेली जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध संघटनांसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. ज्यामुळे भारताला 2025 पर्यंत पूर्णपणे क्षयरोगमुक्त बनण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.”

या आजारातून बरे होण्याच्या आपल्या स्वतःच्या अनुभवांची आठवण त्यांनी यावेळी काढली. या आजारावरील उपचार हे भौतिक असले तरी त्यातून बरे होण्याची सुरुवात मानसिक निरोगीपणामधून होते, त्यामुळे सकारात्मक मानसिकतेवर लक्ष केंद्रित करण्याचा आणि क्षयरोगाविषयी असलेला सामाजिक न्यूनगंड बाजूला सारण्याचा सल्ला त्यांनी दिला. या आजारातून पूर्णपणे बरे होण्यासाठी काही वेळ लागू शकतो तरीही आपले आरोग्य सर्वंकष पद्धतीने नीट राखणे आणि भौतिक पैलूच्या पलीकडे जात मानसिक आरोग्य देखील टिकवणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तम आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे असे सांगत त्यांनी या लोकचळवळीत सहभागी होण्याचे आणि 2025 परंत भारत क्षयरोगमुक्त होईल हे सुनिश्चित करण्यामध्ये योगदान देण्याचे आवाहन केले.

“मला असे वाटते की कोणाचाही त्यांचे वय, पंथ, लिंग किंवा क्षमता यांच्या आधारे विचार न करता ते मागे पडणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे मला ठामपणे वाटते. यामध्ये क्षयासारख्या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीचा समावेश होतो. त्यांच्यात कधीही एकटेपणाची भावना निर्माण होता कामा नये आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी एक नागरिक म्हणून जे काही करता येणे शक्य आहे ते करणे आपले कर्तव्य आहे. एक मित्र म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि आपण त्यांच्या पाठिशी आहोत असा विश्वास त्यांच्यात निर्माण केला पाहिजे. त्यामुळेच मी नि-क्षय मित्र या उपक्रमाला स्वतः एक नि-क्षय मित्र म्हणून संपूर्ण पाठिंबा जाहीर करते.”

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web