‘गुड समेरिटन’ पुरस्कार योजनेच्या आढाव्यासाठी राज्यस्तरीय देखरेख समिती

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविल्याबद्दल गुड समेरिटनला पुरस्कार देण्याच्या योजनेच्या योग्य अंमलबजावणीबाबत त्रैमासिक आढावा घेण्याकरिता राज्यस्तरीय देखरेख समितीची स्थापना गृह विभागाने शासन निर्णयाद्वारे केली आहे.

केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शनास अनुसरून मोटार वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीस तत्काळ मदत करणाऱ्या आणि अपघाताच्या सुरुवातीच्या काही तासात अपघातग्रस्तांना हॉस्पिटल्स / ट्रॉमा केअर सेंटरमध्ये वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या गुड समेरिटनला पुरस्कार देण्यात येतो.

या राज्यस्तरीय देखरेख समितीचे अध्यक्ष अपर मुख्य सचिव (गृह) असून या समितीमध्ये आयुक्त (आरोग्य सेवा), प्रधान सचिव (विशेष/गृह), अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) हे सदस्य आहेत. या समितीचे सदस्य सचिव परिवहन आयुक्त हे काम पाहतील.

ही समिती या योजनेच्या प्रभावी व कार्यक्षम अंमलबजावणीचा दर तीन महिन्यांनी आढावा घेईल. तसेच राज्यातील तीन सर्वात योग्य नामांकन प्रस्ताव राष्ट्रीय पुरस्कारासाठी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयास सादर करेल. केंद्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वातील तरतुदीनुसार समितीचे कामकाज चालेल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web