नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या अंबरनाथ पूर्व उपविभागात सेरेन इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम व्यावसायिकाकडून रिमोटच्या साह्याने वीजचोरी होत असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. या बांधकाम व्यावसायिकाने मार्च २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या २१ महिन्यात ३३ लाख ४३ हजार ९७० रुपये किंमतीची ८० हजार ३८७ युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. व्यावसायिकाविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ प्रमाणे कारवाई सुरू आहे.
अंबरनाथ पुर्वेतील पाले परिसरात सर्व्हे क्रमांक ४९, ५७ आणि ५८ मध्ये सेरेन इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम व्यावसायिकाकडून गृहसंकूल उभारण्याचे काम सुरू आहे. एका ठिकाणच्या बांधकामासाठी या व्यावसायिकाला सुरुवातीला वीजजोडणी देण्यात आली. बारा माळ्याचे दोन गृहसंकूल उभारल्यानंतर या व्यावसायिकाने अनधिकृतपणे जुन्याच वीजजोडणीवरून बाजूच्या गृहसंकुलासाठी वीजवापर सुरू ठेवला. बारापैकी सहा माळ्याचे बांधकाम त्याने अनधिकृतपणे घेतलेल्या जुन्याच वीजजोडणीवरून पूर्ण केले. उल्हासनगर विभाग दोनचे कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकून नुकतीच सेरेन इन्फ्रास्ट्रक्चरच्या वीजजोडणीची तपासणी करण्यात आली. यात सेरेन इन्फ्रास्ट्रक्चरकडून वीज मीटरमध्ये फेरफार करून रिमोटच्या साह्याने विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळले. सखोल तपासणीअंती सेरेन इन्फ्रास्ट्रक्चरने गेल्या २१ महिन्यात ३३ लाख ४३ हजार ९७० रुपये किंमतीची वीज चोरल्याचे निष्पन्न झाले. संबंधित बांधकाम व्यावसायिकाला चोरीच्या विजेचे देयक भरण्याबाबत नोटिस देण्यात आली आहे. या देयकाचा मुदतीत भरणा न झाल्यास सेरेन इन्फ्रास्ट्रक्चर विरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसात फिर्याद देण्यात येणार आहे. अशी माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे