नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
उत्तर प्रदेश /प्रतिनिधी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज (1 नोव्हेंबर 2022) उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा येथे सातव्या भारतीय जल सप्ताहाचे उद्घाटन केले.
पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे असे त्या यावेळी म्हणाल्या. भारतीय सभ्यतेमधे, पाणी केवळ जीवनातच नाही तर जीवनानंतरच्या प्रवासातही महत्त्वाचे आहे. म्हणूनच सर्व जलस्रोत पवित्र मानले जातात. मात्र सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्या नद्या आणि जलाशयांची अवस्था बिकट होत चालली आहे, गावातील तलाव कोरडे पडत आहेत आणि अनेक स्थानिक नद्या नामशेष झाल्या आहेत. शेती आणि उद्योगांमध्ये पाण्याच्या वापराचा अतिरेक होत आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे, हवामानाचे स्वरूप बदलत आहे आणि अवकाळी अतिवृष्टी सामान्य झाली आहे. अशा परिस्थितीत पाण्याच्या व्यवस्थापनावर चर्चा करणे हे अत्यंत स्तुत्य पाऊल आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या.
पाण्याचा प्रश्न केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी महत्वाचा आहे. ही समस्या राष्ट्रीय सुरक्षेशीही संबंधित आहे, कारण उपलब्ध गोड्या पाण्याचा मोठा साठा दोन किंवा अधिक देशांमध्ये विभागलेला आहे. त्यामुळे एकत्रित जलस्रोतच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या. डेन्मार्क, फिनलंड, जर्मनी, इस्रायल आणि युरोपियन संघ, सातव्या भारतीय जल सप्ताहात सहभागी होत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. या मंचावर विचार आणि तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीचा सर्वांना फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेतीसाठीही पाणी प्रमुख स्त्रोत आहे. एका अंदाजानुसार, आपल्या देशातील सुमारे 80 टक्के जलस्रोत हा शेतीसाठी वापरला जातो. त्यामुळे जलसंधारणासाठी सिंचनामधे पाण्याचा योग्य वापर आणि व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले. ‘पंतप्रधान कृषी सिंचन योजना’ या क्षेत्रातील एक मोठा उपक्रम आहे. देशातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी ही देशव्यापी योजना राबवण्यात येत आहे. जलसंधारणाच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने, या योजनेत ” थेंबाथेंबात अधिक पिक” याची खातरजमा करण्यासाठी सुस्पष्ट सिंचन आणि पाणी बचत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा विचार केला आहे असे त्या म्हणाल्या.