नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन यांच्या सहकार्याने आरंभ स्पोर्ट्स फाऊंडेशन च्या माध्यमातून एलिट लिगा आट्यापाट्या २०२२ (पर्व पहिले) या स्पर्धेचे नूतन विद्यालय, कल्याण प. येथे २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी मोठ्या दिमाखात आयोजन संपन्न झाले.. खेळाडूंनी खेळाडूंसाठी बनवलेली हि संस्था असून खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव मिळावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यातून एकूण ४८ खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर कौतुकास्पद कामगिरी केली. या स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या साऊथ स्कॅल्पर्स या संघावर अंतिम सामन्यात सरळ दोन सेट मध्ये विजय मिळवत नॉर्थर्न बिअर्स या संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकविले, तर वेस्टर्न टायटन्स आणि ईस्ट ईगल्स या दोन संघाना तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत स्वप्निल महाजन (साऊथ स्कॅल्पर्स) याने मालिकावीर पुरस्कार पटकवला. तसेच दुर्गेश घुमरे (साऊथ स्कॅल्पर्स) उत्कृष्ट संरक्षक, अजिंक्य ढोले (वेस्टर्न टायटन्स) उत्कृष्ट आक्रमक, आदित्य नागरिकर (नॉर्थर्न बिअर्स) उत्कृष्ट सुर ठरले.