नेशन न्युज मराठी टिम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी आपण मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. मात्र त्यानंतर काय, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळत नाही, आपण शोधत नाही. स्वामीराज प्रकाशन या संस्थेने हे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यातूनच निर्मिती झाली आहे ‘मराठी आठव दिवस’ या उपक्रमाची. मराठी लिहा, मराठी वाचा आणि मराठीतच बोला…एवढे साधे सूत्र यामागे आहे. दर महिन्याच्या २७ तारखेला महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही शहरात, गावात जाऊन मराठी माणसांना एकत्र करत, काहीतरी सादर करतात…जे असते फक्त मराठी आणि मराठी! २७ मार्च २०२२ रोजी, कोल्हापूर येथून या उपक्रमाला सुरुवात झाली. नंतर मराठी आठव दिवसाची ही वारी कणकवली, गोवा, मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी, नालासोपारा, ठाणे येथे गेली. एकाच दिवशी ३ ते ४ ठिकाणी हे कार्यक्रम समांतर पद्धतीने राबविले जातात.
ऑक्टोंबर महिन्यात दिवाळी असल्याने, मराठी आठव दिवस निमित्त, कल्याण आणि परळ, मुंबई येथे “मराठी दिवाळी” साजरी करण्यात आली.
स्वामीराज प्रकाशन, मुंबई आणि कल्याण काव्य मंच यांच्या संयुक्त विद्यमाने, कल्याण महिला मंडळ सभागृह येथे ह्या अनोख्या दिवाळीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवतीला, १०६ हुतात्म्यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
अष्टगंध प्रकाशनच्या “भुकेचा सोहळा” ह्या संदिप शंकर कळंबे यांच्या गझलसंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ गझलकार प्रशांत वैद्य, अभिनेत्री मेघा विश्वास आणि अभिनेता सुधाकर वसईकर यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले. “अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आपली कविता जपणाऱ्या कवीचा पहिला गझलसंग्रह प्रकाशित करताना मनस्वी आनंद होतो आहे. नव्या पिढीतील या गझलकाराला पुस्तक रूपाने अष्टगंध प्रकाशन रसिकांसमोर घेऊन आले तर स्वामीराज प्रकाशनने मोठ्या मनाने हा सोहळा आपल्या मंचावर करण्याचे औदार्य दाखवले. मी धन्य झालो! या दोन्ही प्रकाशन संस्थांचे आभार मानावे तितके थोडे. रसिक वाचकांनी आता संदिप कळंबे यांना, त्यांच्या दर्जेदार कवितेला दाद देत आपले म्हणावे एवढीच प्रार्थना आहे.” अशी अपेक्षा गझलकार प्रशांत वैद्य यांनी बोलून दाखवली. अभिनेत्री मेघा विश्वास आणि अभिनेता सुधाकर वसईकर यांनी संदिप कळंबे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ह्या नंतर, स्वररंग निर्मित “इये माराठीचीये नगरी, आम्हां घरी नित्य दिवाळी!” हा मराठी संस्कृतीची मनोहारी अनुभूती देणारा अनोखा कार्यक्रम सादर झाला. अभिनेत्री आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट मेघा विश्वास यांची संकल्पना, आरेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या अभिवाचनाने दिवाळीची गोडी अधिकच वाढवली. स्वतः मेघा विश्वास, अमेय रानडे, समीर सुमन आणि तपस्या नेवे यांच्या अप्रतिम सादरीकरणाने रसिकांना जिंकून घेतले. अंशुमन गद्रे आणि रुपेश गांधी यांनी साईड रिदम म्हणून आपली जबाबदारी पार पाडत, कल्पकतेने संगीताची पेरणी करीत संहितेत रंग भरले. भाषा, साहित्य, खानपान – पेहराव – आभूषण संस्कृती आणि विवीध पैलूंचा परामर्श घेत “मराठी”पण, त्याचा पैस किती अमर्याद आहे याची प्रचिती रसिकांना दिली. रसिक प्रेक्षकांनी प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
“मराठी दिवाळी” साजरी करण्यासाठी कल्याण शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. बालरोतज्ज्ञ डॉ सुहास चौधरी, कवी-समीक्षक राजीव जोशी, कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे सचिव, साहित्यीक- रंगकर्मी भिकू बारस्कर, कवी अजित मालांडकर, अनिस पत्रिकेचे संपादक उत्तम जोगदंड, अनिस ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश देवरुखकर, अनिस कल्याण शाखाध्यक्ष डॉ बसवंत, शाहू शिक्षण मंडळाचे सचिव डॉ गिरीश लटके, रंगकर्मी श्रीरंग दाते, सुरेश पवार, देवेंद्र शिंदे, सीताराम शिंदे, राजेंद्र वाघमारे, सुधा पालवे, प्रज्ञा वैद्य, सीमा झुंजारराव, मीना ठाकरे, विजया शिंदे, सुनील खांडेकर, श्रीकांत पेटकर, साक्षी धोरण आदी मान्यवर उपसथित होते. अवकाळी पावसाने पीडित शेतकऱ्यांसाठी उपस्थित रसिकांनी सढळ हस्ते आर्थिक योगदान जमा केले. जमा रकमे एवढी रक्कम स्वामीराज प्रकाशन त्यात जोडून ती रक्कम नगर जिल्ह्यातील शेतकरी यांच्या मदतीसाठी पाठवणार आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटी दिवाळी फराळाचा आस्वाद घेत, पुढील वर्षी अशीच अभिनव दिवाळी साजरी करण्याचा मानस सर्वांनी केला.