इलेक्ट्रीक वाहन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नवी मुंबई महानगरपालिकेचा सहभाग

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – वर्ल्ड मिडिया ॲण्ड एक्पो यांच्या वतीने इलेक्ट्रीक वाहने, चार्जींग स्टेशन, बॅटरीज ॲण्ड अलाईड सर्व्हिसेस याबाबतच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये पर्यावरणशील दृष्टीकोन जपत नवी मुंबई महानगरपालिकेने सहयोगाची भूमिका घेतली होती. 14 व 15 ऑक्टोबर 2022 या कालावधीत सिडको एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या ड्राईव्ह इलेक्ट्रीक एक्सपो या प्रदर्शनात इलेक्ट्रीक वाहने व उपकरणे संबंधीत देशातील नामांकित उद्योग समुहांनी सहभाग घेतला होता.

या प्रदर्शनामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेनेही जनजागृतीपर स्टॉल उभारून करून आजच्या बदलत्या युगात इंधनाची कमतरता लक्षात घेऊन इलेक्ट्रीकल वाहनांचा वापर वाढावा याविषयी जागरुकता तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून केला जाणारा इलेक्ट्रीक वाहनांचा वापर व इतर पर्यावरणपूरक कामे यांची चित्रांकित माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. स्टॉलमधील आकर्षक माहिती फलक तसेच एलईडी टिव्हीवर नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उल्लेखनीय कामांची माहितीप्रद चित्रफित प्रदर्शित करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्टॉलला हजारहून अधिक नागरिकांनी भेट देत महानगरपालिकेच्या पर्यावरणशील कामांचे कौतुक केले. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 नुसार इलेक्ट्रिक वाहन वापराला चालना देणेकरिता व इलेक्ट्रिक वाहनकारिता चार्जिंग स्टेशन उभे करणेकरिता तसेच याविषयी व्यापक जनजागृती व्हावी यादृष्टीने सदरचे भव्यतम प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले तसेच अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरिष आरदवाड हे प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. सदर प्रदर्शनाचे यजमान शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने या प्रदर्शनात सहभागी होत पर्यावरणशील असणा-या ई-वाहनांचे महत्व अधोरेखीत केले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web