नेशन न्यूज़ मराठी टीम.
मुंबई/संघर्ष गांगुर्डे – भाजपच्या चुकीच्या धोरणांना व दडपशाहीला देशातील जनता कंटाळली असून आता हळूहळू ग्रामीण भागात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपच्या नागपूर येथील पराभवावर जोरदार टीका केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून त्यामध्ये नागपूरकरांनी भाजपला सपशेल नाकारले आहे असा थेट हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला आहे.महाराष्ट्रात कूटनीतीच्या माध्यमातून भाजपने शिवसेनेमध्ये बंड घडवून आणले आणि सत्तापरिवर्तन केले हे महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेले नाही असेही महेश तपासे म्हणाले.
मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांच्या महापालिकेतील सेवेचा राजीनामा हा उच्च न्यायालयातून मंजूर करावा लागतो एवढं दडपण शिंदे – फडणवीसांनी अधिकाऱ्यांवर आणले होते त्यातून अतिशय गलिच्छ पातळीचे राजकारणही शिंदे व फडणवीस यांनी केल्याचा आरोपही महेश तपासे यांनी केला.
नागपूर जिल्ह्याचा हा निकाल महाराष्ट्रातील भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुकांची नांदी आहे व संविधानावर विश्वास ठेवणारी महाराष्ट्रातील जनता मतदानाच्या रूपाने स्वतःला व्यक्त करत आहे असा विश्वासही महेश तपासे यांनी व्यक्त केला.