नेशन न्युज मराठी टिम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – 11 ऑक्टोबरपासून भारतात सुरु झालेल्या “17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 मध्ये नवी मुंबईतील पहिला सामना आज नेरुळ नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियम मध्ये संपन्न होणार आहे.जगभरातील 18 देशांच्या 17 वर्षाखालील महिला फुटबॉल संघांचे खेळाडू यात भाग घेनार आहे.केडीएमसी शाळेतील विद्यार्थांनीही अशा मोठ्या फुटबॉल स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कल्याणचे नाव गाजवावे म्हणून केडीएमसीने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम केडीएमसीच्या वतीने सुरू केला आहे. विद्यार्थ्याना खेळाची गोडी लागण्यासाठी ही बाब फार महत्वाची आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कला गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने केडीएमसी शिक्षण मंडळातर्फे एक स्पेशल उपक्रम राबवण्यात येत आहे. ज्याचाच एक भाग म्हणून आज केडीएमसी शाळेतील 25 मुलं आणि 25 मुली असे तब्बल 50 विद्यार्थी आज फुटबॉलचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
कल्याणातील नामांकित एलीट स्पोर्टिंग अकादमीच्या माध्यमातून केडीएमसी शाळेचे हे 50 विद्यार्थी गेल्या तीन महिन्यांपासून समन्वयक शीतल रसलाम, मुख्य प्रशिक्षक लेस्टर पिटर्स, प्रशिक्षक स्लेज स्टॅनली यांच्या माध्यमातून फुटबॉलचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत आहेत. तेदेखील कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय.
आणि महापालिकेने सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाला आणि या 50 मुलामुलींच्या प्रयत्नांना हळूहळू यश येऊ लागल्याचे दिसत आहे. जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे पुढच्या महिन्यात होणाऱ्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी यांच्यातील मोहम्मद हुसैन आणि सोहेल खान या दोघा खेळाडूंची निवड झाली आहे. ही केडीएमसी आणि या वंचित मुलांच्या आई वडिलांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद अशी बाब आहे. कारण मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या या वंचित घटकातील मुला मुलींचा की त्यांच्या पालकांचा फुटबॉलशी काडीमात्रही संबंध नाही. या पार्श्वभमीवर हे विद्यार्थी आज फुटबॉलचे आभाळ कवेत घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
महापालिका शाळांमधील मुलांना अशा खेळाचे प्रशिक्षण मिळणे खूप कठीण होते. मात्र या मुलांमध्ये खूप टॅलेंट असून त्यांचे टॅलेंट हंट करून त्यांच्या दोन टीम बनवण्यात आल्या आहेत. या टीमना खेळाचे आवश्यक साहित्य पुरवण्यात येत असून ही मुलं अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार होत असल्याची प्रतिक्रिया केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. तर फुटबॉलसोबतच खो खो, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट आदी क्रीडा प्रकारांसाठीही महापालिकेने पुढाकार घेतला असून येत्या काळात होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये हे खेळाडू नक्कीच चमकदार कामगिरी करतील असा विश्वासही आयुक्त डॉ. दांगडे यांनी व्यक्त केला.
यावेळी केडीएमसीचे सचिव संजय जाधव, मुख्य लेखा परीक्षण अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुक्त धैर्यशील जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, शिक्षण विभागाचे अधिकारी विजय सरकटे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.