बीएसई एसएमईने ४०० सूचीबद्ध कंपन्यांचा गाठला विक्रमी टप्पा

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (SME) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मधील व्यासपीठ  बीएसई एसएमईने 400 सूचीबद्ध कंपन्यांचा टप्पा गाठल्याबद्दल मुंबईत आयोजित कार्यक्रमाला   केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पीयूष गोयल आज उपस्थित होते. आज आठ कंपन्या सूचीबद्ध झाल्याने  बीएसई एसएमई व्यासपीठाने  400 सूचीबद्ध कंपन्यांचा विक्रमी टप्पा गाठला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज या विशेष प्रसंगानिमित्त औपचारिक घंटा वाजवली.

बीएसई ने मार्च 2012 मध्ये सेबी अर्थात भारतीय प्रतिभूती  आणि विनिमय मंडळाने  घालून दिलेल्या नियमांनुसार बीएसई एसएमई व्यासपीठाची निर्मिती केली. बीएसई एसएमई हे व्यासपीठ देशभरात विखुरलेल्या  असंघटित क्षेत्रातील कंपन्यांना मुंबई शेअर बाजार म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध होण्यासाठी उद्योजक आणि गुंतवणूकदारांना अनुकूल वातावरण प्रदान करते. सूचीबद्ध लघु आणि मध्यम उद्योग,  बीएसई एसएमई व्यासपीठाच्या  उंबरठ्यावर पाऊल ठेवतात आणि भविष्यातील प्रगती  आणि विकासासाठी वित्तीय  जगतात प्रवेश करतात. बीएसई एसएमई व्यासपीठ, या लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी समभाग स्वरूपात  भांडवल उभारण्यासाठी मदत करते आणि अशा प्रकारे कालानुरूप त्यांचे रूपांतर  पूर्ण वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये होण्यासाठी  सहाय्य करते.  तसेच त्यांना सध्याच्या अटी आणि नियमांनुसार बीएसईच्या मुख्य मंडळामध्ये सामावण्यासाठी  सक्षम करते.

400 सूचीबद्ध कंपन्या हा बीएसई एसएमईसाठी एक विक्रमी टप्पा आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणाले. कंपन्यांना बीएसईच्या मुख्य बाजारात  सूचिबद्ध होण्यासाठी बीएसई एसएमई व्यासपीठ एखाद्या मजबूत आधाराचे कार्य करू शकते, असे त्यांनी सांगितले. बीएसई एसएमई व्यासपीठाकडे अफाट क्षमता असून या परिसंस्थेची ओळख जगभरात व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी एक्सचेंजला केले. आपल्याला एक्सचेंजची प्रतिमा जगासमोर आणायची आहे,  तसेच बीएसई एसएमई  बद्दल आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना अधिक जवळीक वाटेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, आंतरराष्ट्रीय निधी पुरवठादारांना देखील  या एक्सचेंजची माहिती मिळणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. यादृष्टीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने आपले काही प्रतिनिधी किंवा सूचिबद्ध कंपन्यांचे सदस्य, प्रतिनिधी म्हणून परदेशात पाठवावेत ,  जेणेकरून अधिकाधिक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार एक्सचेंजच्या व्यवहारात भाग घेतील, असे मत गोयल यांनी व्यक्त केले. 

एसएमई अर्थात लघु व मध्यम उद्योग  हा भारताच्या विकासगाथेचा अविभाज्य भाग आहे आणि अधिक सहकार्य आणि सहभाग या बीएसई एसएमई एक्सचेंजच्या वाढीला गती देईल, असे गोयल यांनी सांगितले.  आपल्याकडे 100 पेक्षा अधिक  युनिकॉर्न आहेत, तसेच अनेक सूनिकॉर्न(लवकरच युनिकॉर्न होण्याची क्षमता असलेले व्यवसाय ) युनिकॉर्न बनण्याच्या मार्गावर आहेत.  वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय बीएसई आणि स्टार्टअप परिसंस्था  यांच्यात भागीदारी निर्माण करण्यास मदत करू शकते. हे दोघांसाठी उपयुक्त ठरेल, स्टार्टअप्सना जलद गतीने वाढण्यास मदत करेल  आणि बीएसईचा मंच विस्तारण्यास मदत करेल,” असे गोयल यांनी सांगितले. 

या विनिमय बाजाराच्या  प्रचंड क्षमतेबद्दल बोलताना, वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणाले, “मुंबई हे असे ठिकाण आहे जिथून एसएमई क्षेत्राला नवे पंख मिळतील, अधिक भांडवल उभारले जाऊ शकेल  आणि खऱ्या अर्थाने एक आंतरराष्ट्रीय केंद्र ठरेल ज्यामुळे अधिक एसएमईंना वेगाने विकास करता येईल.  “बीएसई एसएमई मंच गिफ्ट सिटी  येथे मंच  स्थापन करण्याबाबत विचार करू शकते” असेही त्यांनी सुचवले.

केंद्रीय मंत्र्यांनी बीएसईला स्टार्टअप परिसंस्थेसह  इंटरफेस तयार करण्याचे आवाहन केले.  यामुळे  त्यांना वेगाने वाढण्यास आणि स्टार्टअपमध्ये देशांतर्गत भांडवलाला प्रोत्साहन देण्यास मदत करेल. भारताच्या विकासगाथेबद्दल  बोलताना ते म्हणाले, आज संधींबाबत भारत जेवढा वाव पुरवतो तेवढा जगात कुठेच  नाही. “भविष्यात  भारत जागतिक विकासाचे  नेतृत्व करेल. जग भारताच्या विकासगाथेबद्दल  उत्साही आणि आशादायी आहे. ते आपल्याकडे  आत्मविश्वास आणि आशेने  पाहत आहेत

महामारीतून टप्याटप्याने पुनरुज्जीवनाचे  उद्दिष्ट सरकारने ठेवले असून  उद्योगांनी जबरदस्त लवचिकता दर्शविली आहे, असे गोयल यांनी नमूद केले. “रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सध्याची भू-राजकीय परिस्थिती योग्य पद्धतीने  हाताळली आहे”,असे ते म्हणाले. 

आज सूचिबद्ध  झालेल्या आठ कंपन्यांचे प्रतिनिधी, व्यापारी, गुंतवणूकदार, उद्योग प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. जयपूर शहराचे खासदार रामचरण बोहरा, बीएसईचे अध्यक्ष एस. एस. मुंद्रा आणि बीएसई एसएमई आणि स्टार्ट-अप प्लॅटफॉर्मचे प्रमुख अजय ठाकूर हेही उपस्थित होते.

आतापर्यंत 152 कंपन्या मेन बोर्डवर स्थलांतरित झाल्या आहेत. बीएसई एसएमई  प्लॅटफॉर्मवर सूचिबद्ध  असलेल्या 394 कंपन्यांनी बाजारातून 4,263 कोटी रुपये उभारले आहेत आणि 7 ऑक्टोबर 2022 रोजी 394 कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल  60,000 कोटी रुपये आहे. 60 टक्के मार्केट शेअरसह(बाजार वाट्यासह ) बीएसई या क्षेत्रात  मार्केट लीडर आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web