नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – नाशिक येथे आज पहाटे झालेल्या खाजगी बस अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त बसची पाहणी केली. त्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात जाऊन अपघातातील जखमी प्रवाशांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली आणि आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील व गरज पडल्यास खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.या घटनेची गंभीर दखल घेऊन मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच जखमींवर विनामूल्य उपचार करण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
अशाप्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महामार्गावरील ब्लाइंड स्पॉट शोधून ते दूर करण्याचा प्रयत्न करू तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असलेल्या वाहनांची देखील तपासणी करून त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई करू, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे आणि सुहास कांदे आदी उपस्थित होते.