सट्टेबाजीच्या जाहिराती प्रसारीत केल्यास होणार दंडात्मक कारवाई,डिजिटल माध्यमांसह टीव्ही वाहिन्यांना इशारा

नेशन न्युज मराठी नेटवर्क.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – ग्राहकांना निर्माण होत असलेले लक्षणीय अर्थसाहाय्यविषयक आणि सामाजिक आर्थिक धोके,विशेषतः युवा वर्ग आणि बालकांसाठी असलेले धोके विचारात घेऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज ऑनलाईन सट्टेबाजीच्या साईट्सच्या जाहिराती आणि या साईट्सच्या छुप्या(सरोगेट) जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी तशा प्रकारची सक्त ताकीद देणाऱ्या दोन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पहिली सूचना खाजगी टीव्ही वाहिन्यांसाठी आणि दुसरी सूचना ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी जारी करण्यात आली आहे. मंत्रालयाने यापूर्वी 13 जून 2022 रोजी ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म्सच्या जाहिरातींची प्रसिद्धी टाळण्याची मार्गदर्शक सूचना वृत्तपत्रे, खाजगी टीव्ही वाहिन्या आणि डिजिटल वृत्तवाहिन्यांना केली होती.

त्यानंतर सरकारच्या असे निदर्शनास आले की टीव्हीवरील अनेक क्रीडा  वाहिन्या, त्याचबरोबर ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरून परदेशी ऑनलाईन बेटींग प्लॅटफॉर्म्सच्या त्याचबरोबर त्यांच्या सरोगेट न्यूज वेबसाईट्सच्या जाहिराती प्रसारित करत आहेत. या मार्गदर्शक सूचना जारी करताना, या प्रकारांची पुष्टी करणारे फेयरप्ले, पारीमॅच, बेटवे, वुल्फ777 आणि  1xBet यांसारख्या परदेशी बेटिंग प्लॅटफॉर्म्सच्या प्रत्यक्ष आणि छुप्या जाहिरातींचे दाखले देण्यात आले आहेत.

या सूचनांमध्ये मंत्रालयाने अशी माहिती दिली आहे की परदेशी ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्म्स न्यूज वेबसाईट्सचा वापर डिजिटल मीडियावर बेटिंग प्लॅटफॉर्म्सची जाहिरात करण्यासाठी छुपे उत्पादन म्हणून करत आहेत. अशा प्रकारच्या सरोगेट न्यूज वेबसाईटसचे लोगो आणि या बेटिंग प्लॅटफॉर्म्समध्ये कमालीचे साधर्म्य असल्याचे अशा प्रकरणांमध्ये मंत्रालयाला आढळले आहे. या बेटिंग प्लॅटफॉर्म्सची किंवा या न्यूज वेबसाईट्सची भारतात कोणत्याही कायदेशीर प्राधिकरणाकडे नोंदणीदेखील झालेली नाही याकडे मंत्रालयाने लक्ष वेधले आहे. या वेबसाईट्स बातम्यांच्या आडून छुप्या जाहिरातींच्या माध्यमातून सट्टेबाजी आणि जुगाराला प्रोत्साहन देत आहेत.

देशाच्या बहुतांश  भागांमध्ये सट्टेबाजी आणि जुगार बेकायदेशीर असल्याने असे बेटिंग प्लॅटफॉर्म्स आणि त्यांची छुपी उत्पादने ही देखील बेकायदेशीर आहेत, असे मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये  म्हटले आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019, केबल टीव्ही नेटवर्क नियामक कायदा 1995 आणि माहिती तंत्रज्ञान  नियम 2021 यातील तरतुदींवर या मार्गदर्शक सूचना आधारित आहेत. या जाहिराती संबंधित विविध कायद्यांशी सुसंगत नाहीत आणि टीव्ही वाहिन्या त्याचबरोबर डिजिटल न्यूज पब्लिशर्सना अशी सक्त ताकीद देण्यात येत आहे की अशा प्रकारे बेटिंग प्लॅटफॉर्म्स किंवा सरोगेट न्यूज वेबसाईट्सची जाहिरात करू नये आणि या निर्देशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी आठवण देखील टीव्ही वाहिन्यांना करून देण्यात येत आहे. त्याच प्रकारे ऑनलाईन जाहिरातींच्या मध्यस्थांना देखील मंत्रालयाने भारतीय प्रेक्षकांना अशा जाहिरातींद्वारे लक्ष्य करू नका असा सल्ला दिला आहे. 

सट्टेबाजी आणि जुगारामुळे ग्राहकांसाठी लक्षणीय अर्थसाहाय्यविषयक आणि सामाजिक- आर्थिक धोके निर्माण झाले आहेत विशेषतः युवा वर्ग आणि बालकांना त्याचा धोका आहे, असे मंत्रालयाने सांगितले आहे. त्यामुळे सार्वजनिक हित विचारात घेऊन ऑफलाईन किंवा ऑनलाईन सट्टेबाजी/जुगार यांना जाहिरातींद्वारे प्रोत्साहन देऊ नये असे मंत्रालयाने सुचवले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या दोन मार्गदर्शक सूचनांसंदर्भात ग्राहक व्यवहार विभागाशी विशेष सल्लामसलत केली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web