स्वदेशी बनावटीचे आणि देशातच विकसित केलेले लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात दाखल

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला मोठे प्रोत्साहन देणारे, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच-तुलनेने हलक्या वजनाचे लढाऊ हेलिकॉप्टर) आज भारतीय हवाई दलात औपचारिकरित्या दाखल झाले. जोधपूर इथे झालेल्या या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अध्यक्षस्थानी होते. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) याची संरचना केली असून ते  विकसितही केले आहे.   “प्रचंड” असे नामकरण झालेल्या या हेलिकॉप्टरचा समावेश  देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना  होत आहे; भारतीय हवाई दल  भविष्यात जगातील अव्वल हवाई दल  असेल आणि संरक्षण उत्पादनांबाबत आपण पूर्णपणे आत्मनिर्भर असू याचेच हे द्योतक आहे असे संरक्षण मंत्री म्हणाले. भारतीय हवाई दलात  दाखल झाल्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी एलसीएचमधून उड्डाणही केले.

स्वातंत्र्यानंतर देशाला भेडसावणाऱ्या अंतर्गत तसेच बाह्य धोक्यांना तोंड देण्यासाठी भारतीय हवाई दलाने  बजावलेल्या भूमिकेचे राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात कौतुक केले. एलसीएचचे प्रबळ सामर्थ्य आणि सक्षमता हवाई दलाची  केवळ लढाऊ क्षमता वाढवत नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर  होण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे असेही ते म्हणाले.

स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टरच्या विकासाकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. मात्र, 1999 मध्ये कारगिल युद्धानंतर, एलसीएचची निकड अधिक जाणवू लागली आणि आजचे एलसीएच  दोन दशकांच्या संशोधन आणि विकास तसेच त्या दिशेने झालेल्या स्वदेशी प्रयत्नांचे फळ आहे असे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.

आधुनिक युद्धासाठी आणि कारवाईच्या विविध स्थितींमध्ये आवश्यक गुणवत्ता मापदंडांची एलसीएच पूर्तता करते.  स्वसंरक्षण, विविध प्रकारचे दारुगोळा वाहून नेण्यात आणि त्वरीत घटनास्थळी पोहोचवण्यात ते सक्षम आहे असे संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले.

युक्रेन आणि इतरत्र नुकत्याच झालेल्या संघर्षांत आपल्याला दाखवून दिले आहे की 

युद्धभूमीवर जलद हालचाल करु न शकणारी अवजड शस्त्र प्रणाली आणि संबंधित मंच, कधीकधी असुरक्षित ठरतात आणि शत्रूसाठी सोपे लक्ष्य बनतात असे ते म्हणाले.

एचएएलने संरचना आणि विकसित केलेले एलसीएच पहिले स्वदेशी बहुउपयोगी लढाऊ हेलिकॉप्टर आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web