स्वच्छ अमृत महोत्सवा”च्या स्वच्छता कार्यात तृतीयपंथीयांचा उत्स्फुर्त सहभाग

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – “स्वच्छ अमृत महोत्सवा”च्या अनुषंगाने “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता विषयक नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले आहे. नवी मुंबईच्या आजवरच्या नावलौकीकात नागरिकांच्या उत्स्फुर्त सहभागाचा फार मोठा वाटा असून या स्वच्छता उपक्रमांमध्ये विविध समाज घटकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग घेण्यात येत आहे. अशाच प्रकारच्या एका वेगळ्या उपक्रमाचे वाशी सेक्टर 10 ए येथील मिनी सी शोअर येथे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईतील 207 तृतीयपंथी नागरिकांनी एकत्र येऊन “स्वच्छता कार्यात आमचाही सहभाग” असे म्हणत मिनी सी शोअर परिसराची साफसफाई केली.

तसेच त्या परिसरात रॅली काढून जनजागृती केली. या उपक्रमात त्यांनी हिरव्या, निळ्या व काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून ओला, सुका व घरगुती घातक कचरा वर्गीकरणाचे महत्व पोषाखातून पटवून दिले. लेट्स सेलीब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची विशेष नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या विविध क्षेत्रातील विक्रम नोंदविणा-या राष्ट्रीय मानांकित संस्थेमार्फत घेण्यात आली असून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता नवी मुंबई महानगरपालिकेस प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले आहे. ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ चे परीक्षक श्री. बी.बी. नायक यांनी हे प्रमाणपत्र व मेडल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना राजीव गांधी स्टेडीयममधील विशेष कार्यक्रमाप्रसंगी प्रदान केले.

नवी मुंबई महानगरपालिकेने आवाहन केल्यानंतर नवी मुंबईकर नागरिकांचा सक्रीय सहभाग हे शहराचे वैशिष्ट असून त्यामध्ये सर्व समाज घटक स्वयंस्फु्रर्तीने सहभागी होतात. यापूर्वीही तृतीयपंथी नागरिकांनी कचरा वर्गीकऱण व स्वच्छतेच्या विविध बाबींबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन काम केले असून इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत एकत्र येऊन स्वच्छते विषयी जागरुकता तसेच नवी मुंबई शहराविषयीचे प्रेम अधोरेखीत केले आहे. त्यांच्या या एकात्म भावनेने केलेल्या सेवाभावी कामाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ मार्फत घेण्यात आली असून हा केवळ त्यांचाच नाही तर संपूर्ण नवी मुंबई शहराचा गौरव आहे अशी भावना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web