बृहन्मुंबई महापालिका कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/संघर्ष गांगुर्डे – बृहन्मुंबई महापालिकेचे कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहीर केले. मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.

या निर्णयामुळेबृहन्मुंबई महापालिकेचे ९३ हजार आणि बेस्टचे २९ हजार कर्मचाऱ्यांसह, शिक्षक, आरोग्य सेविका यांना दिवाळी बोनस मिळणार आहे.

‘कोविडच्या बिकट परिस्थितीत बृहन्मुंबई महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. विकास कामांवर खर्च केलाच पाहिजे पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे’ असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना ‘आनंदात दिवाळी साजरी करा. पण सगळ्यांनी मुंबईकरांसाठी मनापासून काम करा,’ असे आवाहन केले.

बैठकीस खासदार राहुल शेवाळे, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर,  महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आदी तसेच संदिप देशपांडे, शशांक राव, संतोष धुरी, उत्तम गाडे, अशोक जाधव,तसेच मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे, कार्याध्यक्ष शेषराव राठोड, सरचिटणीस संजीवन पवार, उपाध्यक्ष श्री भाऊ मोहिते, चंद्रकांत चाफे, सिद्धार्थ शिवराम कदम, सह सहचिटणीस सुभाष मर्चंडे, संजय कांबळे बापेरकर तसेच कार्यालय सचिव श्री रुपेश देसाई उपस्थित होते. यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोविडच्या बिकट परिस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मुंबईतील कोविडची परिस्थिती नियंत्रणात राखण्यात डॉक्टर्स, सर्व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. विकास कामांवर खर्च झालाच पाहिजे. पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन ही मिळाले पाहिजे. विकास काम आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजना यांचा समतोल राखावा लागेल. कर्मचारी आणि नागरिक आपलेच आहेत.’

दिवाळी बोनसची घोषणा करतानाच मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आनंदात दिवाळी साजरी करा. मुंबई महापालिकेशी निगडीत विकास कामांतील तसेच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी या प्राधान्याने सोडविल्या जातील. सगळ्यांनी आता मुंबईकरांसाठी मनापासून काम केले पाहिजे. रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे नागरिकांच्या मनासारखी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी अभियंत्यांपासून ते सर्वांनीच दक्षता घ्यावी,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बैठकीत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठीची ‘श्रमसाफल्य’ आणि ‘आश्रय’ या योजनेतील घरे उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. विविध विकास यंत्रणांना सोबत घेऊन अशी घरे मोठ्या संख्येने उपलब्ध व्हावीत यासाठी स्वतंत्र समन्वय बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

दिवाळी बोनसची मागणी आणि त्यातील वाढीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिकेच्या सर्वपक्षीय अशा कर्मचारी संघटनाना विश्वासात घेऊन बैठक घेतली. त्याबद्दल आणि बोनससाठी विविध घटकांचा सहानुभूतीने विचार केल्याबद्दल उपस्थित संघटना पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web