कल्याणात मेळ्याच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या उत्साहात

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – गेल्या शतकाहुन अधिक काळा पासून कल्याण गावातील मेळा गणपतीची परंपरा अद्यापही अखंडित सुरू असून यामेळा गणपतीचे विसर्जन एकादशीच्या दिवशी मोठया भक्ती भावाने करण्याची प्रथा आहे .कल्याण गावातील मेळा गणपतीच्या विसर्जना साठी मिरवणुका ढोल ताशाच्या गजरात ठरवून दिलेल्या मार्गाने गणेश घाटावर मार्गस्थ होऊन बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जात होता.लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी कल्याणच्या सुभेदार वाड्यात १८९५ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

त्या काळी देशप्रेमाने भारलेल्या तरुणांची एवढी मोठी संख्या कल्याणात होती की, समाजामध्ये देशप्रेम वाढीस लागावे यासाठी त्यानंतरच्या काळात वाणी, तेली, चांद्रसेनी कायस्थ प्रभू, खाटीक मंडळी, धनगर, पांचकळशी, गुजराथी, मराठे मंडळी वगैरे मंडळांनी आपआपल्या समाजातर्फे हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मेळ्याच्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या या उत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेला कल्याण शहरात प्रचंड महत्त्व आहे. गणेशोत्सवात आकर्षक सजावट आणि देखावे करण्यात कल्याणातील मंडळे आणि कार्यकर्ते मागे नसायची. पण मुंबई, पुण्यातील गणेशोत्सव देखाव्यांचे कौतुक त्यांनाही असे.अर्थात मंडळाचा गणेशोत्सव असल्याने मुंबई, पुण्यातील देखावे पाहण्यासाठी जाणे शक्य नसायचे. अशा स्थितीत येथील काही मंडळांनी एक नामी शक्कल काढली. एकादशीच्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करून उरलेले दोन दिवस मुंबई-पुण्यातील गणेशदर्शनाला निघायचे, अशी परंपराच कल्याणमध्ये सुरू झाली.

अशा एकादशीच्या दिवशी विसर्जन करणाऱ्या मंडळांच्या गणरायांना ‘मेळय़ाचे गणपती’ असे संबोधले जाऊ लागले. इतरत्र सहसा कुठे न आढळणारी एकादशीच्या विसर्जनाची परंपरा कल्याण मध्ये सुरू आहे.या गणपतींचे विसर्जन एकादशीच्या दिवशी केले जाते. प्रत्येक गणपतीचा मान ठरलेला आहे. मात्र काळाच्या ओघात अनेक मंडळे या मेळ्यातून बाहेर पडली असली तरी आजही १२ मंडळांचा मेळा गणेशोत्सव मंडळात समावेश आहे. हे सर्व गणपती आपापल्या मानाप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. प्रत्येकाचे नंबर ठरवून दिलेले असून त्या नंबरचा गणपती विसर्जनासाठी निघाल्यानंतर त्यापुढील गणपती या रॅलीत सहभागी होत असतात.

अत्रे रंगमंदिराकडून निघडलेल्या या विसर्जन मिरवणुकीत तेली मंडळी, वैश्य समाज मंडळ, धनगर समाज मंडळ, शाहू छत्रपती गणेशोत्सव मंडळ, नवजीवन गणेशोत्सव मंडळ, उदय गणेश मंडळ, बाल गणेश मंडळ, बच्चीराम तेली गणेश मंडळ, कुंभारवाडा गणेश मंडळ, गुजराती समाज मंडळ, हनुमान प्रासादिक गणेशोत्सव मंडळ, गजानन प्रासादिक मंडळ या १२ गणपतींचा समावेश असून या गणपतीच्या मिरवणुका ढोल ताशाच्या गजरात ठरवून दिलेल्या मार्गाने गणेश घाटावर मार्गस्थ होत होते . शेवटच्या गणपतीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web