राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग मध्ये संकेत सरगर याला सिल्वर मेडल

नेशन न्यूज मराठी टीम.

सांगली – इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022 ) सांगलीच्या संकेत महादेव सरगर यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पुरूषांच्या ५५ किलो गटात रौप्यपदक पटकावले आहे. बर्मिंगहम मधील या स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक आहे.

संकेत सरगर हा सांगली जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचा खेळाडू असून त्याने सन 2013-14 पासून गुरूवर्य कै. नाना सिंहासने यांच्या सांगलीतील दिग्विजय वेटलिफ्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये वयाच्या 13 व्या वर्षापासून वेटलिफ्टिंगचे धडे घ्यावयास सुरूवात केली. नाना सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचा पाया भक्कम झाल्यावर संकेतने सन 2017 पासून शिवछत्रपती पुरस्कार विजेते मयुर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील धडे घेतले. त्यांनी संकेतच्या ट्रेनिंगची दीर्घकालीन योजना आखली. ट्रेनिंग, डायट, रेस्ट व इंज्युरी मॅनेंजमेंट याचा योग्य ताळमेळ घालत संकेतचा सराव सुरू होता. त्याने 2018 पासून राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरूवात केली.  ऑफ सिझनमध्ये दिवसातून तीन वेळाही त्याचे ट्रेनिंग असायचे. या मेहनतीमुळे 2019 ते 2020च्या दरम्यान त्याची कामगिरी उंचावली. संकेतने अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळविले. जानेवारी 2020 ते मार्च 2020 दरम्यान सलग चार राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवत सुवर्णपदक मिळवून वरिष्ठ राष्ट्रीय उच्चांकही मिळविले. याची दखल घेत संकेतची भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘टॉप्स’ मध्ये निवड झाली.

कोविड 19 मधील लॉकडाऊन काळात ट्रेनिंगमध्ये काहीसा व्यत्यय आला पण लॉकडाऊननंतर दिग्विजय इन्स्टिट्यूट पुन्हा सुरू झाले. साधारणपणे ऑगस्ट 2020 ला त्याच्या कमरेत जोरात इंज्युरी झाली. स्पाँडिलायसीसचे निदान झाले. महाराष्ट्राचे वेटलिफ्टिंगचे क्रीडा मार्गदर्शक मधुरा टोळे यांनी मुंबईचे डॉ. किरण नारे स्पोर्टस फिजिओथेरेपिस्टना संपर्क करण्याचा सल्ला दिला.  डॉ. किरण नारे यांचे उपचार आणि कोच मयुर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली संकेतने दुखापतीवर मात करत जानेवारी 2021 ला संकेतचा फॉर्म परत आणला. इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशनने फेब्रुवारीमध्ये त्याचे नॅशनल कॅम्प सिलेक्शनचे पत्र पाठविले. फेब्रुवारी 2022 ला सिंगापूर इंटरनॅशनलमध्ये त्याने नविन राष्ट्रकुलचे उच्चांक नोंदवत 2022 बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आपले स्थान पक्के केले.

संकेत हा हिंदकेसरी कै. मारूती माने यांच्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणारा सांगलीतील दुसरा खेळाडू आहे. 1970 साली कै. मारूती माने यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.  आज तब्बल 52 वर्षाने सांगलीच्या खेळाडूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपर्यंत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे.

इंग्लंडच्या बर्मिंगहम या ठिकाणी चालू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये संकेत सरगर या खेळाडूने वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मिळविल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली यांच्यामार्फत संकेत सरगर यांच्या आई-वडिलांचे व त्याचे प्रशिक्षक शिवछत्रपती पुरस्कारार्थी मयूर सिंहासने यांचा सत्कार करण्यात आला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web