नवी मुंबईत ‘आयुष इमारत संकुलाचे’ उद्घाटन

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई – केंद्रीय आयुष तसेच, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज महाराष्ट्रात नवी मुंबईत खारघर इथे आयुष इमारत संकुलाचे उद्घाटन झाले. ह्या नव्या संकुलात, केंद्रीय युनानी चिकित्सा परिषदेच्या अधिपत्याखाली, प्रादेशिक  होमिओपॅथी   संशोधन संस्था (RRIH)आणि प्रादेशिक युनानी चिकित्सा संशोधन संस्था (RRIUM) सुरु होणार आहेत.

या संकुलाचे उद्घाटन केल्यावर, आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, भारतीय पारंपरिक वैद्यकीय चिकित्सा पद्धती लोकांचे आयुष्य सुदृढ आणि समृद्ध करण्यासाठी गेल्या कित्येक शतकांपासून महत्वाचे योगदान देत आहेत. “पारंपरिक आणि अप्रचलित अशा वैद्यकीय पद्धतींचे लाभ आधुनिक चिकित्सापद्धतींसोबत एकत्रित करण्याच्या कल्पनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोत्साहन दिले आहे.” असे ते म्हणाले.  होमिओपॅथी  प्रादेशिक संशोधन संस्थेला, ‘अॅलर्जीमुळे होणाऱ्या विकारांवर संशोधन संस्था’ म्हणून  विकसित करण्याचा आयुष मंत्रालयाचा विचार आहे, तसेच, युनानी प्रादेशिक संशोधन संस्थेला, इलाज-बित-तदबीर म्हणजेच,  जीवनशैलीत बदल घडवून सुदृढ शरीराठी दिल्या जाणाऱ्या उपचारांचे उत्कृष्टता केंद्र म्हणून विकसित करण्याचा आमचा मानस असल्याचे सोनोवाल यांनी पुढे सांगितले.

1999.82 चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधलेल्या, या तीन मजली इमारतीच्या संकुलात वैद्यकीय तसेच संशोधन सुविधा आहेत. या संस्थेत बाह्य रुग्ण चिकित्सा सल्लामसलत, औषधे,बालके, वृद्ध आणि सामान्य लोकांसाठी नियमित रक्तविज्ञान आणि जीव रसायनशस्त्र प्रयोगशाळा अशा सुविधा असतील. तसेच,  होमिओपॅथी   आणि युनानी चिकित्सा विभागांची जबाबदारी वेगवेगळ्या प्रमुखांकडे असेल, असे त्यांनी सांगितले.

“ह्या नव्या संकुलाचे उद्घाटन करत, आयुष मंत्रालयाने भारतीय पारंपारिक औषधी पद्धतींचा प्रचार आणि वापर करण्यास प्रोत्साहन देण्याच्या आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.” असे सोनोवाल म्हणाले. “मुंबई आणि महाराष्ट्रातल्या लोकांना या संस्थांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या यशाबद्दल बोलताना आयुष मंत्री म्हणाले की, यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनी भारतात २२ कोटींहून अधिक लोकांनी योगासने केली. ‘योग शब्दाचा अर्थ ‘जोडणे’; आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून जगभरातील लोकांना जोडले आहे .आयुष मंत्रालयाच्या होमिओपॅथी विभागाच्या  सल्लागार डॉ संगीता ए दुग्गल, राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे अध्यक्ष डॉ अनिल खुराना आणि दिल्ली सरकारचे आयुष संचालक डॉ राज के मनचंदा तसेच इतर अनेक मान्यवर उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.

प्रादेशिक  होमिओपॅथी   संशोधन संस्था (RRIH), नवी मुंबई आणि  प्रादेशिक युनानी चिकित्सा संशोधन संस्था   (RRIUM), नवी मुंबई या केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद (CCRH) आणि केंद्रीय युनानी चिकित्सा संशोधन परिषद  (CCRUM)या सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारे शासित संस्थांअंतर्गत कार्यरत असलेल्या संस्था आहेत. प्रादेशिक होमिओपॅथी संशोधन संस्था (RRIH) सुरुवातीला क्लिनिकल रिसर्च युनिट म्हणून सन 1979 मध्ये स्थापन करण्यात आली आणि 1987 मध्ये मुंबईत होमिओपॅथीसाठी प्रादेशिक संशोधन संस्था म्हणून तिच्या श्रेणीत सुधारणा करण्यात आली. ही संस्था नवी मुंबई परिसरात  2010 पासून भाडेतत्त्वावरील जागेत  कार्यरत होती.

प्रादेशिक युनानी चिकित्सा संशोधन संस्था  (RRIUM) सुरुवातीला क्लिनिकल रिसर्च युनिट (युनानी) म्हणून कार्यरत होती जी 1981 मध्ये स्थापन करण्यात आली होती, त्यानंतर 1986 मध्ये  RRIUM मध्ये  तिच्या श्रेणीत सुधारणा करण्यात आली आणि तेव्हापासून ती भायखळा येथील सर जे.जे. हॉस्पिटल कंपाऊंडमध्ये कार्यरत आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web