नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण मधील श्री गजानन विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे जनजागृती अभियानांतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या एपीआय दिपाली वाघ, सायबर सेक्युरिटी एक्सपोर्ट धर्मेंद्र नलावडे व ऍड श्वेता बाबर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एपीआय दिपाली वाघ यांनी पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. परिसरात अल्पवयीन, कुमारवयीन मुलांशी संबंधित होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती दिली. अशा वेळी गुन्हा सहन करू नये घाबरू नये तर आपले पालक शिक्षक पोलीस यांच्याशी मोकळा संवाद साधण्याचे आवाहन केले. गुड टच बॅट टच पोक्सो कायद्याची माहिती मुलांना देण्यात आली.

धर्मेंद्र नलावडे यांनी इंटरनेटचा अति व निष्काळजी वापरातून निर्माण होणारे गुन्हे आयटीआर २००० याची माहिती दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलचा वापर गरजेपुरता करावा. अनोळखी लिंक किंवा कोड चा वापर करू नये, ओटीपी शेअर करू नये, इंटरनेटच्या आभासी जगापासून सावध राहून केवळ गरजेपुरताच मोबाईलवापर करावा अन्यथा टाळावा असे सांगितले. इंटरनेटचा वापर करताना परिपूर्ण माहिती करून घ्या काळजीपूर्वक वापरा अमिषांना बळी पडू नका असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन शंका समाधान करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापिका माध्यमिक विभाग कांचन भालेराव, संस्थेचे सचिव केदार पोंक्षे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माळी मॅडम उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांचे स्वागत इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या सीड बॉल्स व पर्यावरण पूरक कापडी पिशव्या देऊन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे आभार माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव यांनी मानले.