६६ महिला-दिव्यांग बारवी प्रकल्पग्रस्तांना मिळाली गावाजवळच्याच महापालिकेत नोकरी!

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – बारवी प्रकल्पग्रस्त महिला व दिव्यांगांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरी करण्यास पसंती दिली आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या सुचनेनुसार, महिला व दिव्यांगांना लॉटरीपूर्वी सर्वप्रथम नोकरीचे ठिकाण निवडण्याची संधी दिल्यामुळे १०५ पैकी ६६ उमेदवारांना मनपसंत `गावाजवळचे शहर’ नोकरीसाठी मिळाले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी प्रकल्पग्रस्तांना अपॉईंटमेंट लेटर दिले जाणार आहे.
बारवी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी व घरांच्या बदल्यात नोकरी किंवा पैसे देण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१६ मध्ये घेतला होता. त्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर झाला होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा प्रश्न रखडला होता. या प्रकरणी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी महसूल विभाग, एमआयडीसी विभाग यांच्या एकत्रित बैठका घेतल्या. या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चार बैठकांनंतर अखेर प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मिटला होता.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या सुचनेनुसार प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीच्या ठिकाणासाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, लॉटरी काढण्यापूर्वी महिला व दिव्यांगांना पसंतीचे ठिकाण घेण्याची मुभा द्यावी. त्यानंतर उर्वरित जागांवर लॉटरी काढावी, असे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सुचविले होते. त्यामुळे कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात शुक्रवारी लॉटरी काढण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे-पाटील व एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता सुधीर नागे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. त्यात ६६ महिला व दिव्यांग उमेदवारांनी कल्याण महापालिकेची निवड केली.
कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ १९ उमेदवारांनी उल्हासनगर महापालिका, तर प्रत्येकी १० उमेदवारांनी कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेची निवड केली. प्रकल्पग्रस्त महिला व दिव्यांगांपैकी कोणीही ठाणे, मिरा-भाईंदर, नवी मुंबई महापालिका आणि स्टेमची निवड केली नाही. राहत्या घरापासूनचे दूरवरील अंतर हाच निकष मानून महिला-दिव्यांगांनी मोठ्या महापालिकांकडे दुर्लक्ष केले असल्याचे मानले जाते.
चार महापालिका, स्टेममध्ये केवळ पुरुष प्रकल्पग्रस्त उमेदवार,मिरा-भाईंदर महापालिकेमध्ये ९५, नवी मुंबईत ६७, स्टेम प्राधिकरणात ३४ आणि ठाणे महापालिकेत २८ पुरुष उमेदवारांची निवड झाली आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांना येत्या स्वातंत्र्यदिनी `अपॉईंटमेंट लेटर’ दिले जाणार आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web