भारतीय हवाई दलातर्फे एव्हीओनिक्सच्या स्वदेशीकरणाविषयी चर्चासत्र

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

पुणे – भारतीय हवाई दलाने 18 आणि 19 जुलै 2022 रोजी हवाई दलाच्या पुण्यातील बेस रिपेअर डेपो येथे  एव्हीओनिक्स म्हणजे विमानातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि भाग यांच्या स्वदेशीकरणाविषयी चर्चासत्राचे (AVISEM – 22) आयोजन  केले होते. या चर्चासत्राची एव्हीओनिक्सचे स्वदेशीकरण ही संकल्पना  “मॉड्युलर ओपन सिस्टीम आर्किटेक्चर (MOSA) फ्रेमवर्क म्हणजे परवडण्याजोग्या आणि अंगीकार करता येणाऱ्या तंत्रज्ञान आणि व्यवसाय धोरणावर आधारित होती. या कार्यक्रमाचे संचालन हवाई दल मुख्यालयाच्या स्वदेशीकरण संचालनालयाने केले आणि भारतीय हवाई दलाच्या देखभाल कमांडचे प्रमुख  एअर मार्शल विभास पांडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.

क्षमतांच्या प्रत्यक्ष सादरीकरणात आत्मनिर्भरता  अंगिकारणे, विमानचालन प्रणालीमध्ये कमर्शियल ऑफ-द-शेल्फ (COTS) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे आणि पाश्चिमात्य आणि रशियन देशाच्या मूळ सामग्री उत्पादकांवरील (OEM) अवलंबित्व कमी करणे हा या चर्चासत्राचा मुख्य उद्देश होता. या चर्चासत्रात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आस्थापना, शैक्षणिक संस्था आणि हवाई वाहतूक उद्योगातील सदस्यांना  आमंत्रित करण्यात आले होते.

भारतीय हवाई दलाच्या देखभाल विभागाचे प्रमुख  एअर मार्शल विभास पांडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात भारतीय हवाई दलाच्या विशाल आणि वैविध्यपूर्ण ताफ्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि मूळ सामग्री उत्पादकांवरील अवलंबित्व कमीत कमी करण्यासाठी देशात पर्याय तयार करण्याच्या गरजेवर भर दिला. संरक्षण आणि विकास केंद्रे, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि भारतीय हवाई दल यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कौशल्यातील ससूत्रतेच्या पैलूंना स्पर्श करून भारतीय हवाई दलाची  क्षमता वाढवण्यासाठी त्यांचा कसा उपयोग केला जाऊ शकतो यावर त्यांनी विशेषतः लक्ष वेधले. हवाई वाहतूक क्षेत्रात कमर्शियल ऑफ-द-शेल्फ तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या महत्त्वावर आणि गरजेवर भर देताना, त्यांनी हार्डवेअर आणि कार्यात्मक अप्रचलिततेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून सॉफ्टवेअर परिभाषित प्रणाली आणि समानतेची तत्त्वे या संकल्पना विशद केल्या.

संकल्पनांवर आधारित पाच सत्रे आयोजित करण्यात आली होती आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय हवाई दलातील मान्यवर  या सत्रांच्या अध्यक्षस्थानी होते. सत्रादरम्यान, विषय तज्ञांनी विमानचालनामध्ये COTS तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दिशेने प्रमाणीकरणाशी संबंधित आव्हानां व्यतिरिक्त एव्हियोनिक समुच्चय विकसित करण्यात आधुनिक निदान आणि दुरुस्ती तंत्रांचा वापर करून स्वदेशी दुरुस्ती क्षमता विकसित करणे, दोष निदानासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञान, प्रिंटेड सर्किट बोर्ड (PCBs) चे रिव्हर्स इंजिनिअरिंग, आणि COTS आधारित MOSA फ्रेम यावर त्यांचे विचार मांडले. कार्यक्रमात  दुरुस्ती आणि विकासासाठी MOSA फ्रेमवर्क स्वीकारण्यावर सर्वसाधारण एकमत दिसून आले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web