नागरिकांच्या मनात घर करून गेला आयुक्तांचा कृतज्ञता आणि स्वागत सोहळा

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली – आपण ज्यावेळी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा पदभार घेतला त्यावेळी वाटले नव्हते की या शहरांशी आणि इथल्या लोकांशी इतके चांगले ऋणानुबंध जुळतील. एक कुटुंब म्हणून आपल्या सर्वांशी आपुलकी निर्माण झाल्याने आपलं घर सोडून चालल्याची भावना मनामध्ये दाटून आल्याचे भावोद्गार डॉ. विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झालेल्या कृतज्ञता आणि स्वागत सोहळ्यात ते बोलत होते.डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या झालेल्या पदोन्नती आणि केडीएमसी आयुक्त म्हणून डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर कृतज्ञता आणि स्वागत सोहळ्या आयोजित करण्यात आला होता.

आपल्या जागी डॉ. भाऊसाहेब दांगडे येणार हे समजून खूप आनंद झाला. कारण प्रशासनात आपल्यानंतर येणारी व्यक्ती खूप महत्वाची असते. एखाद्या संस्थेची उंची वाढवायची असेल तर चांगल्या व्यक्ती सतत लाभणे आवश्यक आहे. आपल्यामध्ये आणि भाऊसाहेब दांगडे यांच्या कार्यपद्धतीत फारसा फरक नाहीये. मला लपवा व भाऊसाहेब दांगडे यांना बाहेर काढा एवढे साम्य माझ्यात आणि भाऊसाहेब यांच्यात आहे असही विजय सूर्यवंशी म्हणाले. कामाबद्दल आपुलकी असणारा अधिकारी आपल्याला मिळालं असून डॉ. दांगडे यांच्या कार्यकाळात महापालिका अजून देदीप्यमान होईल असा विश्वासही डॉ. सुर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केला.

आपल्या कारकिर्दीमध्ये जेवढे शक्य होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही काही कामे मार्गी लावण्याची मनापासून इच्छा होती. प्रत्येक नागरिकानेही आता या शहराबद्दल आपुलकीची भावना ठेवली पाहीजे या मताचा पुनरुच्चारही डॉ. विजय सुर्यवंशी यांनी यावेळी केला.

डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आपल्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे. त्यांनी या शहरांसाठी विकासाची पायाभरणी केली आहे. त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय आपल्याला मिळेल असे नवनियुक्त आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी सांगितले. तसेच डॉ. विजय सुर्यवंशी यांनी या शहरासाठी मोठं काम करून ठेवले आहे. त्यांचे हे काम आपण सार्थपणे पुढे घेऊन जाऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आणि डॉ. विजय सुर्यवंशी यांचे कौतुक केले.

डॉ. विजय सुर्यवंशी यांनी या शहराचे एक नागरिक म्हणून स्वतःला झोकून देऊन काम केले. कोवीड काळात उत्तम प्रकारे काम करत विकासाचे प्रकल्प कुठेही अडणार नाहीत याची काळजीही त्यांनी घेतली. एक आदर्श कमिश्नर या शहराला लाभला होता असे गौरवोद्गार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी दूरध्वनीच्या माध्यमातून खासदार डॉ. शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर नवीन नियुक्त झालेले डॉ. भाऊसाहेब दांगडे साहेब हे डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या तोडीस तोड काम करतील, लोकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत आपल्याकडून आपण अजून चांगले काम करा अशा शब्दांत त्यांनी नवीन आयुक्त डॉ. दांगडे यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी सचिन बासरे, आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी – देवनपल्ली, महापालिका सचिव संजय जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमास आलेल्या प्रत्येक नागरिकच्या चेहऱ्यावर आपला घराचा कार्यक्रम आहे असा भाव होता. कुणालाही वेळेचे भान राहिले नव्हते. पाच तास एका जागेवर बसून सुद्धा हा सोहळा संपूच नये असे प्रत्येकाला वाटत होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web