मुरबाड रेल्वेसाठी राज्य सरकारकडे ५० टक्के खर्चाची हमी देण्याची मंत्री कपिल पाटील यांची विनंती,सरकार कडून हमीसाठी निर्देश

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे –  नियोजित कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाच्या खर्चात राज्य सरकारकडून ५० टक्के खर्च उचलण्यात येणार आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाकडे ५० टक्के खर्चाच्या हमीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश आज दिले.
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून कल्याणहून मुरबाडपर्यंत रेल्वेमार्गासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या प्रयत्नानेच या मार्गाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाच्या कामात राज्य सरकारने ५० टक्के वाटा उचलावा, अशी मागणी २०१९ मध्ये कपिल पाटील यांनी केली होती. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुंबईत आज भेट घेतली. तसेच नियोजित रेल्वेच्या कामासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी देण्याची विनंती केली. मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी रेल्वे अत्यावश्यक आहे. मुरबाडवासियांना रेल्वेसेवा देण्यास भाजपा कटीबद्ध आहे, असे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरबाड रेल्वेमार्गाच्या खर्चात ५० टक्के वाटा उचलण्यासंदर्भात हमी देण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
या निर्णयामुळे नियोजित मुरबाड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारचा निधी मिळणार असल्यामुळे कामाला निश्चितच वेग येईल. मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web