हरियाणा, दिल्ली-एनसीआरमधील औषध उत्पादक आणि वितरकांवर इन्कम टॅक्सच्या धाडी

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्‍ली – औषध उत्पादन आणि वितरण तसेच बांधकाम व्यवसायातील समूहांवर 29.06.2022 रोजी प्राप्तिकर विभागाने छापे घालत जप्तीची कारवाई केली. या अंतर्गत दिल्ली-एनसीआर आणि हरियाणामधील 25 ठिकाणी कारवाई करण्यात आली. 

अनेक सुटे दस्तावेज आणि डिजिटल माहितीच्या रूपात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवहाराचे पुरावे सापडले असून ते जप्त केले आहेत. या समूहाने मोठ्या प्रमाणावर औषधांचा रोखीने बेहिशेबी व्यवहार केल्याचे या दस्तऐवजांवरून स्पष्ट होत आहे. विक्री, खरेदी, मजुरी आणि इतर खर्चाचे व्यवहारही रोखीने झाल्याचे आढळून आले.

अफगाणिस्तानमधे औषधांची विक्री करण्यासाठी हवालाद्वारे रोखीचा व्यवहार करण्याची पद्धत असल्याचे या साखळीतील एका सूत्रधाराने कबूल केले आहे. अशाप्रकारे हवालाद्वारे अंदाजे 25 कोटींचा व्यवहार झाल्याचे जप्त केलेल्या दस्तावेजातील प्राथमिक माहितीच्या आधारे उघड झाले आहे. 

सक्रीय औषध घटक (एपीआय) क्षेत्रात काम करणाऱ्या एका औषध उत्पादन कंपनीकडे 94 कोटी रुपयांच्या औषधांचा अतिरिक्त साठा सापडला आहे. 

बेहिशेबी रोख विक्रीतून निर्माण होणारी रोकड, स्थावर मालमत्तेच्या खरेदीमध्ये आणि औषधांच्या उत्पादन सुविधांच्या विस्तारामध्ये गुंतवली गेली आहे.  समूहाच्या बांधकाम संस्थांनी विनानोंद विक्री आणि रोखीने मालमत्ता खरेदी केल्याचे आढळले. अशा मालमत्तेच्या व्यवहारांवर मिळालेल्या भांडवली नफ्याची भरपाई करण्यासाठी समूहाने शेअर बाजारात बोगस दीर्घकालीन/अल्पकालीन भांडवली तोटा देखील दाखवला आहे. अशा बोगस नुकसानीची रक्कम सुमारे 20 कोटी रुपये इतकी आहे. या समूहाने हिमाचल प्रदेशात  स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी बेनामी संस्थाही तयार केल्याचं शोध कारवाईतून समोर आलं आहे.

आतापर्यंत बेहिशेबी रोकड 4.2 कोटी रुपये आणि 4 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.पुढील तपास सुरू आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web