ठाणे जिल्हातील विकासाच्या दृष्टीने सरकारकडे राष्ट्रवादीच्या विविध मागण्या

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – ठाणे जिल्हातील विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाशी संलग्न विविध प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी केली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध विकास कामांना न्याय देण्यासाठी लवकरात लवकर राज्य शासनाने मान्यता द्यावी अशी मागणी देखील हिंदुराव यांनी केली आहे.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला प्रमोद हिदुराव यांच्यासहप्रसाद महाजन, प्रदेश सचिव, रमेश हनुमंते प्रदेश सरचिटणीस भरत गोंधळी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, प्रविण खरात प्रदेश चिटणीस दिनेश पटेल व्यापारी सेल शहर सचिव, प्रसाद सदलगे जिल्हा उपाध्यक्ष, रेखा सोनावणे – जिल्हा उपाध्यक्ष, सुरय्या पटेल जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अय्याज मौलवी उपस्थित होते.

जवळपास अडीच वर्षे चाललेले राज्यातील हे महविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडानंतर उलथवून टाकले. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्रीपदाचा बहुमान प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून ठाणे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्या आणि इथल्या ग्रामीण भागाला मुख्य प्रवाहाशी जोडणाऱ्या योजनांना गती देण्याची आग्रही मागणी केल्याचे हिंदुराव यांनी सांगितले.
यामध्ये प्रामुख्याने एम एम आर डी एच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे. जेणेकरून पायाभूत सुविधा, रस्ते, ड्रेनेज,सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, दळण वळण,पाणी पुरवठा आदी महत्वाच्या बाबींचा जलद विकास करणे सोपे जाईल. तसेच कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित केलेला 400 कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, कल्याण आणि मुरबाड तालुक्यात महिलांसाठी इंडस्ट्रीयल इस्टेट सुरू करावी.

त्याच प्रमाणे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आरक्षित जागेवर प्रस्तावित शासकीय रुग्णालयाला मान्यता द्यावी, बेस्टच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी एकच वाहतूक प्राधिकरण स्थापन करावे, मेट्रो रेल्वेचा कल्याणपुढील उल्हासनगर, अंबरनाथ, टिटवाळा, बदलापूर आणि मुरबाडपर्यंत विस्तार करावा अशी मागणी आपण यावेळी केल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याच्या सर्व प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्याकडून या गोष्टींना प्राधान्य देऊन त्यादृष्टीने अंमलबजावणी सुरू होईल असा विश्वासही हिंदुराव यांनी व्यक्त केला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web