अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर व बारवी धरण परिसरात पर्यटकांना जाण्यास बंदी

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे– पर्यटनस्थळे, नदी किनारा, धबधबा येथे पावसाळ्यात होणारे दुर्घटना टाळण्यासाठी अंबरनाथ तालुक्यतील कोंडेश्वर परिसर तसेच बारवी धरण परिसरात तीन किलोमीटर हद्दीत दि. 4 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 या काळात धबधबा परिसरात मद्यपान करणे, धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढणे, खोल/वाहत्या पाण्यात उतरणे व पोहणे आदी कृत्यांना प्रतिबंध करण्यात आले आहे. यासंबंधीचा आदेश अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी दिले आहेत. अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर हे पर्यटन स्थळ आहे. त्या ठिकाणी शंकराचे मंदिर व धबधबे आहेत. त्याचबरोबर चांदप गावचे हद्दीतील बारवी धरण परिसरातही पावसाळयाच्या दिवसात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. काही वेळेस पर्यटक हे मद्यपान करून हुल्लड घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच खोल व वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यामुळे दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोंडेश्वर परिसरातील धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाडे, दहिवली, मळीचीवाडी तसेच चांदप गावच्या हद्दीतील बारवी धरण परिसरातील बारवी नदी, पिंपळोली, आस्नोली, सागाव ते बारवी धरण गेट नं.3 येथील या परिसराच्या 3 किमी क्षेत्रात खालील कृत्यांना प्रतिबंध घालण्यात आला आहे.

त्यानुसार, पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्य सेवन करून प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्या जागेवर मद्य सेवन करणे. पावसामुळे धोकादायक ठिकाणे धबधबे, दऱ्याचे बंदरे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, पावसाळ्यामुळे वेगाने वाहणाऱ्या धोकादायक पाण्यात / खोल पाण्यात उतरणे व पोहणे, धबधब्याच्यावरील बाजुस जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणाऱ्या पाण्याच्या झोता खाली बसणे, धोकादायक स्थिती व जिवीत हानी होईल अशा धबधबे किंवा तलाव याठिकाणी पाण्यात उतरणे, रहदारिच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहणे थांबवणे, वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहन चालविणे, वाहनाने ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टिकच्या बादल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डि.जे. सिस्टीम वाजवणे, गाडीमधील स्पिकर/ ऊफर वाजवणे व त्यामुळे ध्वनिप्रदूषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदूषण होईल, अशी कोणतीही कृती करणे, धरण/तलाव/धबधब्याचे 3 कि.मी परिसरात दुचाकी / चारचाकी/ सहाचाकी वाहनांने प्रवेश करणे आदी कृत्यांना प्रतिबंध करण्यात आले असल्याचे श्रीमती माने यांनी कळविले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web