संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन

नेशन न्यूज मराठी टीम.

सातारा -संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले.  फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि  हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा भक्तिरसात चिंब होऊन गेला.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटण प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्यासह अन्य  मान्यवर व वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्प अर्पण करुन स्वागत केले.
नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी  तसेच लाखो भाविकांनी  दर्शन घेतले. माऊलीच्या  दर्शनासाठी भाविकांनी  एकच गर्दी केली होती.

गेल्या दोन वर्षे कोरोना संसर्गाच्या संकटामुळे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले नाही. कोरोनाचे संकट काही प्रमाणात दूर झाले आहे. यामुळे यावर्षी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. पालखी सोहळ्यामध्ये उत्साह दिसत असून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले असून जिल्ह्यात सहा दिवसांचा मुक्काम आहे. वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधांसह इतर सुविधाही प्रशासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील यांनी राज्यात चांगला पाऊस पडूदे व सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवन आनंदी होऊ दे अशी प्रार्थना यावेळी केली.

आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पाडेगांवमध्ये आगमन झाले. या पालखी सोहळ्यासोबत आलेल्या वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून, गॅस, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा पुरविण्यात येत असून वारकऱ्यांसाठी   मोबाईल टॉयलेटही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याचबरोबर पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web