पुणे विभागातून आषाढी वारीसाठी ५३० बसेसची सेवा

नेशन न्यूज मराठी टीम.

पुणे – यंदाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने पुणे विभागातून ६ ते १४ जुलै या कालावधीत ५३० बसेस सोडण्यात येणार आहेत.

आषाढी वारीसाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातील वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या काठी जमण्याची शक्यता आहे. या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे विभागात जय्यत तयारी सुरू आहे. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येत्या २० जून रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे, तर २१ जून रोजी संत ज्ञानेश्वरर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे स्वारगेट आगारातून आळंदी ते देहू व देहु ते आळंदी व पुणे या प्रवासासाठी ७० बसेस १७ जुनपासूनच सेवेत दाखल झाल्या आहेत.

सासवडला पालखीचा मुक्काम असतो. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे पालखी सोहळा न झाल्याने यावर्षी अधिक संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने सासवड ते पुणे प्रवासासाठी १५० बसेस भाविकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. गेल्या वारीस ११० बसेस सेवेत होत्या. यंदा त्यामध्ये ४० बसेस वाढविण्यात आल्या आहेत.

गावातील वारकऱ्यांनी एकत्रितपणे बसचे बुकींग केल्यास त्यांना गावातूनच बससेवा मिळणार आहे. ४० व्यक्तींची संख्या यासाठी आवश्यक असून ही बस प्रवाशांना पंढरपूर येथे सोडेल. त्यानंतर तेथून पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे.

ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे

पुणे विभागातून ६ ते १४ जुलै या कालावधीत ५३० बसेस सोडण्यात येणार आहेत. लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी वर्गही अहोरात्र कार्यरत राहणार आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web