असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी ई श्रम पोर्टल सुविधा

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबईकेंद्र शासनाकडून असंघटित कामगारांसाठी ई – श्रम पोर्टलवर एकाच ठिकाणी सुविधा मिळणार असून त्यांचा डेटाबेस तयार करण्याचे काम सुरु आहे. स्थलांतरित कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने अशा कामगारांच्या सुविधांसाठी ही योजना राबवली जात आहे. या नोंदणीनुसार असंघटित कामगारांना अपघात विम्याची सुविधा देण्यात येणार आहे.

असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्याच्या उद्देशाने त्यांचा राष्ट्रीय डेटाबेस  (NDUW) तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून त्या अनुषंगाने दि. 16 ऑगस्ट 2021 पासून असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. सदर राष्ट्रीय डेटाबेसच्या आधारावर असंघटित कामगारांकरिता सामाजिक सुरक्षा योजना अमलात आणल्या जाणार आहेत. सद्य स्थितीत NDUW (National Detabase of Unorganised Workers) अंतर्गत नोंदणीकृत कामगारास प्रधानमंत्री सुरक्षा विमा लागू राहणार आहे. नोंदणीकृत कामगारांचा एक वर्षाचा प्रीमियम 12 रुपये केंद्र शासनामार्फत भरला जाणार आहे. बीड जिल्ह्यासाठी 10 लक्ष, 90 हजार, 881 एवढे असंघटित कामगारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

असंघटित क्षेत्रामध्ये खालीलप्रमाणे कामगारांचा समावेश –

ऊसतोड कामगार, शेती काम करणारी व्यक्ती, आशा सेविका व अंगणवाडी सेविका, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, पेंटर/इलेक्ट्रिशियन/प्लंबर, पशुपालन करणारा कामगार, मनरेगा मजूर, सुतार काम करणारी व्यक्ती, घरकाम करणारी महिला, न्हावी कामगार, ब्युटीपार्लर कामगार महिला, रस्त्यावरील विक्रेते, लहान शेतकरी, माथाडी कामगार, बांधकाम कामगार, ऑटो चालक/रिक्षाचालक, वृत्तपत्र विक्रेते, फेरीवाले/भाजीवाले/फळावाले, पीठगिरणी कामगार, वीटभट्टी कामगार आणि चहा विक्रेते असंघटित क्षेत्रात वरीलप्रमाणे 300 कामगार व्यक्तिंचा समावेश होतो.

कामगारांना नोंदणी करण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे –

असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तिचे वय 16 ते 59 दरम्यानचे असावे. ती आयकर भरणारी नसावी. ती व्यक्ती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेची सभासद नसावी. असंघटित कामगार शासनाने निश्चित केलेल्या 300 उद्योगातील असणे आवश्यक आहे.

नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे –

आधार कार्ड, बँक पासबुक, (राष्ट्रीयीकृत बँक अथवा आयएफएससी कोड असलेली इतर कोणतीही बँक). चालू असलेला सक्रिय नेहमी वापरात असणारा मोबाईल क्रमांक. स्वयं नोंदणी करण्यासाठी कामगारांचा सक्रीय मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

नोंदणी कुठे व कशी करावी –

स्वत: करावी, नागरी सुविधा केंद्र (CSC), कामगार सुविधा केंद्र. Eshram portal url : https://eshram.gov.in

चौकशीसाठी पुढीलप्रमाणे हेल्पलाईनवर संपर्क साधवा

राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 14434, टोल फ्री नंबर 18001374150

केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार असंघटित कामगारांच्या नोंदणीची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे. नागरी सुविधा केंद्रामार्फत बँक खात्याचा तपशील ई-मेल आयडी, वारसाचा तपशील व सक्रिय मोबाईल क्रमांक याबाबतचा तपशील अद्ययावत केला जाईल. कामगारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यास कामगारास नागरी सुविधा केंद्रातील (csc) प्रतिनिधीकडून (vle) a4 साईज पेपरवर UAN कार्ड काढून देण्यात येईल. कामगारांना नवीन नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. परंतु कामगारास कोणतीही माहिती अद्ययावत करावयाची असल्यास 20 रुपये नागरी सुविधा केंद्रातील प्रतिनिधीकडून आकारले जातील.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web