महावितरण व वीज ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला एक वर्षाचा कारावासाची शिक्षा

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – वीजबिल कमी करण्याचे आमिष दाखवून वीज ग्राहकांकडून रोख रक्कम घेऊन स्वतःच्या रक्कम शिल्लक नसलेल्या बँक खात्याचा धनादेश महावितरणकडे जमा करायचा आणि महावितरण व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला कल्याण येथील प्रथमवर्ग न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. साहिल असगर पटेल (मूळ रा. बिस्मिल्ला हॉटेलजवळ, मौलबी चौक, गोविंदवाडी, कल्याण पश्चिम) असे या आरोपीचे नाव असून त्याने एकूण २३ ग्राहक व महावितरणची २ लाख ४० हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे.

कल्याण पश्चिम विभाग अंतर्गत विविध चार बिल भरणा केंद्रात येणाऱ्या ग्राहकांना वीजबिल कमी करून देण्याचा बहाणा करून आरोपीने या ग्राहकांकडून रोख रक्कम घेतली. ही रक्कम हडप करून आरोपीने संबंधित ग्राहकांच्या वीज बिलापोटी स्वतःच्या व रक्कम शिल्लक नसलेल्या बँकेचा धनादेश बिल भरणा केंद्रात जमा करून ग्राहकांना त्याची पावती दिली. परंतु हे धनादेश न वटल्याने कल्याण पश्चिम विभाग कार्यालयात परत आले आणि आरोपीचे कारस्थान उघडकीस आले. त्यानुसार वित्त व लेखा विभागाचे उप व्यवस्थापक गजानन राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून महात्मा फुले चौक पोलिसांनी मार्च-२०२१ मध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आय. ए. आर. शेख यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तपासी अधिकारी सहायक पोलिस निरिक्षक डी. एन. ढोले आणि सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भादविच्या कलम ४२० नुसार एक वर्ष कारावास व एक हजार रुपयांचा दंड आणि कलम ४०६ नुसार सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web