वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित,कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातून वीजपुरवठा सुरळीत

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – गुरुवारी (०९ जून) सांयकाळी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कल्याण परिमंडलातील कल्याण मंडल एक आणि दोन, वसई व पालघर मंडल कार्यालयांतर्गत बहुतांश फिडरचा वीजपुरवठा काही काळ बंद ठेवण्यात आला होता. वादळाची तिव्रता कमी झाल्यानंतर बिघाड नसणाऱ्या फिडरवरील वीजपुरवठा अर्धा ते दोन तासांमध्ये सुरु करण्यात आला. तर बिघाड असणाऱ्या फिडरवर पाऊस व अंधाऱ्या रात्री अथकपणे काम करून कर्मचाऱ्यांनी अपवाद वगळता रात्रीच वीजपुरवठा सुरळीत केला.

वादळी वाऱ्याच्या तिव्रतेमुळे मुरबाड उपविभागात डिपी स्ट्रक्चर जमीनदोस्त झाले. तर काही ठिकाणी विजेचे खांब वाकले किंवा कोसळले आहेत. सर्वाधिक बिघाड पीन व डिस्क इन्सुलेटर (चिनी मातीच्या चिमण्या) निकामी झाल्याने घडले. उन्हाळ्यात उष्णतेमुळे तापलेल्या पीन व डिस्क इन्सुलेटरवर पाणी पडल्याने त्या तडकल्याने अपघात टाळण्याची प्रणाली कार्यान्वित होऊन फिडर ट्रिप झाले. मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामात अनेक ठिकाणच्या पीन व डिस्क इन्सुलेटर बदलले असले तरी उन्हाळ्यात सहज लक्षात न येणारे बिघाड पहिल्या पावसात प्रकर्षाने पुढे येतात. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे दूरवर असणाऱ्या वृक्षांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने तसेच वृक्ष उन्मळून पडल्याने वीजवाहक तारा तुटल्या.

अपघात व नुकसान होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खंडित केलेला वीजपुरवठा वादळाची तिव्रता कमी झाल्यानंतर सुरळीत करण्यात आला. त्यानंतर बिघाड असलेल्या वीजवाहिन्यांवर पेट्रोलिंग करून महावितरणचे कर्मचारी, कंत्राटदाराचे कामगार यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. शक्य त्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत केला. मात्र, पर्याय नसलेल्या व दुर्गम भागातील विक्रमगड, कारेगाव, हमरापूर, मोखाडा, वसईतील ट्रिनिटी, विवा कॉलेज, कल्याण ग्रामीणमधील म्हसा, सोनिवली, शेणवा, हाजीमंलग फिडरवर काही भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी पुर्ववत करण्यात आला. तर गुरुवारी रात्री पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत केलेल्या ठिकाणी मुख्य वाहिन्यांवर शुक्रवारी सकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक साहित्यांसह सतर्क राहण्याचे निर्देश कर्मचारी व एजन्सींना यापूर्वीच दिले होते. पहिल्या तीन-चार पावसांमुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी पुन्हा दिल्या आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web