मिफ्फ- २०२२ मध्ये सहभागी झालेल्या तीन दिग्दर्शकांनी मिफ्फमध्ये साधला संवाद

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – मुंबईत सुरु असलेल्या सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, विविध स्पर्धा गटात लघुपट आणि अॅनिमेशनपट असलेल्या तीन दिग्दर्शकांनी आज, 31 मे 2022 रोजी ‘मिफ्फसंवाद’ दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अॅनिमेशन पट निर्माते हेमंत शिंदे यांचा “जंगल-मंगल’, विनीत शर्मा यांचा लघुपट ‘गजरा’ आणि पटकथाकर रवी मुप्पा यांचा ‘इनकोंगनेटो’हा रहस्यपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत.

अॅनिमेशनपट निर्माते हेमंत राजाराम शिंदे यांचा ‘जंगल मंगल’ हा अॅनिमेशनपट मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- मिफ्फ 2022 च्या स्पर्धा गटात आहे. ‘जंगल-मंगल’ हा एक विनोदी अॅनिमेशनपट आहे, ज्यात, जंगली-म्हणजे पृथ्वीवरचे लोक आणि मंगली म्हणजे मंगळ ग्रहवासी यांच्यात युद्ध होतं या संकल्पनेला धरून, धमाल कल्पनाविश्व रंगवलं आहे.

अॅनिमेशन क्षेत्रात दीर्घकाळाचा अनुभव असलेले,शिंदे यांनी, लोकप्रिय कार्टून मालिका, ‘मोटू-पतलू’, ‘शोले 3D’ आणि टूनपूरका सुपरहीरो अशा चित्रपट आणि मालिकांसाठी योगदान दिले आहे. लहान मुलांसाठी तयार केल्या जाणाऱ्या अॅनिमेशनपटात, हिंसा आणि इतर काही असभ्य गोष्टी असू नयेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं. हे चित्रपट मुलांना निखळ आनंद देणारे, त्यांना हसवणारे असावेत, असा आपला प्रयत्न असतो, असे ते म्हणाले. कोविडकाळात ह्या चित्रपटासाठी खूप मेहनत घेता आली, आणि त्यातूनच हा अॅनिमेशनपट तयार झाला असं त्यांनी सांगितलं.

अभिनेते आणि आता दिग्दर्शनात पदार्पण केलेले, विनीत शर्मा यांचा ‘गजरा’ हा लघुपट देखील या महोत्सवात राष्ट्रीय स्पर्धा विभागात आहे. सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी , क्षिती जोग आणि जयवंत वाडेकर अशा दिग्गज अभिनेत्यांची या चित्रपटात भूमिका असून, ध्वनिसंयोजन सुप्रसिद्ध ध्वनिसंयोजक रसूल पुक्कुटी यांनी केलं आहे. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा आणणाऱ्या गोष्टी खूप मोठ्याच असायला हव्यात असं नाही, एक साधासा गजरा देखील त्यांच्या नात्यातला ताजेपणा, गोडवा टिकवून ठेवू शकतो, या कल्पनेवर हा सिनेमा आधारलेला आहे. मुंबईत एका साध्याशा झोपडीत राहणाऱ्या एका जोडप्यात रोज नवऱ्याने बायकोसाठी आणलेल्या गजऱ्यामुळे कसा सुसंवाद कायम राहतो, हे प्रत्यक्ष पाहिल्यावर, त्यावर सिनेमा करावा असा विचार मनात आला, आणि त्यातूनच ह्या लघुपटाची कल्पना साकारली असं, विनीत शर्मा यांनी सांगितलं.

आपण पैसा कीर्ती, प्रसिद्धी अशा सगळ्याच्या मागे धावत आयुष्य वाया घालवतो, मात्र असं धावतांना आपल्याला आत्मचिंतन करायला, आपल्या कुटुंबासोबत राहायला वेळच मिळत नाही, कोविड काळात हे प्रकर्षाने जाणवलं. म्हणूनच नात्यातला बंध अधिक मजबूत करण्याचा संदेश देणारा हा चित्रपट मी तयार केला असं शर्मा यांनी सांगितले.

निर्माते आणि लेखक आणि पटकथाकार रवी मुप्पा यांचा ‘इनकोंगनेटो’ हा चित्रपट नावाप्रमाणेच, आपली ओळख लपवून काम करणाऱ्या मुलीची, रहस्यकथा आहे. एक तरुण मुलगी, छुप्या कॅमेराच्या मदतीने, स्वतःचे व्हिडिओ बनवून त्यातून पैसे मिळवत असते. मात्र एका व्यक्तीला ती हे व्हिडिओ पाठवते,तेव्हा त्यातून त्याला तिच्यावर होणाऱ्या देहविक्रीच्या अत्याचाराची माहिती कळते. तिच्या आयुष्यातला संघर्ष आणि संकटे पाहून त्याची सदसद्विवेकबुद्धी त्याला साद घालते. हा सिनेमा सुप्रसिद्ध इंग्रजी रहस्य चित्रपट दिग्दर्शक अल्फ्रेड हिचकॉक यांच्या ‘हिचकॉकियन थ्रीलर’ च्या शैलीने बनवण्यात आला आहे, असं रवी  मुप्पा यांनी सांगितले.

रवी मुप्पा यांनी, स्त्री, बाला असे यशस्वी चित्रपट आणि ‘द फॅमिली मैन’ सारख्या लोकप्रिय वेबसीरिजची पटकथा लिहिली आहे. त्यांनी ‘वाळू’ या वाळूतस्करांवरील चित्रपटाची कथाही लिहिली आहे

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web