मराठी नाट्य विश्वाच्या बोधचिन्हाचे अनावरण

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – कल्पना अनेक सुचतात, पण त्या प्रत्यक्ष अंमलात येतात, तो क्षण आनंदाचा असतो. मराठी नाट्य सृष्टी, रंगभूमीचा इतिहास यांचे संग्रहालय व्हावे, याची कल्पना काही काळापासून माझ्या मनात होती आणि ती लवकरच मराठी नाट्य विश्व इमारतीच्या रुपाने प्रत्यक्ष साकारणार आहे, याचा मनापासून आनंद होतो आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करून ‘मराठी नाट्य विश्व’ ही नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय इमारत उभारली जाणार आहे. त्याच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मराठी नाट्य विश्वाच्या इमारतीची संकल्पना चित्रफित देखील यावेळी सादर करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर, राजन भिसे, ऋषिकेश जोशी, महानगरपालिकेच्या उपायुक्त  प्रकल्प सल्लागार शशांक मेहेंदळे,  सखी गोखले हे मान्यवर याप्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित होते.

प्रसिद्ध अभिनेता दिलीप प्रभावळकर, सुबोध भावे, दीपक राजाध्यक्ष, प्रमोद पवार, अभय जबडे, मंगेश कदम आणि राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अभियंता हांडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, नाट्यसृष्टी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते सामाजिक वेदना-व्यथा यावर नेमके बोट ठेवून उपाय शोधण्यास प्रवृत्त करणारे माध्यम आहे. काळाच्या पाऊलखुणा जपणे हे महत्त्वाचे काम असते. त्यामुळे मराठी नाट्यसृष्टी व रंगभूमीचा इतिहास सांगणारी मराठी नाट्य विश्वाची इमारत कागदावरुन आता प्रत्यक्षात जमिनीवर साकारणार आहे, याचा आनंद आहे. तसा माझा नाटकांशी काही थेट संबंध नाही, पण माझ्या आजोबांनी सामाजिक समस्यांवर नाटके लिहिली होती. त्याकाळी ठाकरेंना थिएटर मिळू नये म्हणूनदेखील प्रयत्न व्हायचे आणि मिळालेच थिएटर तर, ते अतिशय अस्वच्छ, आतमध्ये कचऱ्याचे ढिगारे, उंदीर आणि घुशी यांचे साम्राज्य असायचे, अशी आठवण सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रत्येक राज्याचे एक वैशिष्ट्य असते. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालला नाटकांची मोठी व अभिमानास्पद परंपरा आहे. त्यामुळे माझ्या मनात काही काळापासून नाट्य संग्रहालयाची कल्पना होती, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या हसवाफसवीच्या प्रयोगाची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. हा प्रयोग खास बाळासाहेबांसाठी दिलीपजींनी मातोश्रीवर आयोजित केला होता. बाळासाहेबांना प्रकृतीच्या कारणामुळे नाट्यगृहात जाऊन पाहणे शक्य नव्हते, म्हणून प्रभावळकर यांनी स्वतः हा प्रयोग घरी येऊन सादर करतो म्हणून सांगितले आणि हा दीड तासांचा प्रयोग प्रभावळकर यांनी इतका रंगवला की, बाळासाहेब उत्स्फूर्तपणे म्हणाले “अरे माणूस आहेस का भूत आहेस तू?”. अशी आठवण सांगून थ्रीडी, फोर डी सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जुनी नाटकं रेकॉर्ड व्हावीत, अशी सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मनोगत व्यक्त करताना मराठी नाट्य विश्वाची वैशिष्ट्ये सांगितली. ते म्हणाले, गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्र असलेला भूखंड राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. त्यावर स्थित क्रीडा केंद्र इमारत मोडकळीस आल्यामुळे सन २००० मध्ये ते बंद करण्यात आले. सुमारे ३ लाख ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर विस्तारलेल्या या केंद्राचा दोन टप्प्यांमध्ये, मराठी रंगमंच कला दालनासाठी एकमेवाद्वितीय अशा स्वरूपात पुनर्विकास करून तिथे ‘मराठी नाट्य विश्व’ या नावाने नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय असा एकत्रित प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने इमारत उभारली जाणार आहे. दोन तळघर, तळमजला आणि त्यावर तीन मजले अशा स्वरूपाची ही इमारत उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु असून येत्या जून महिन्यात इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम सुरु करण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यात नाट्यगृह व संग्रहालयाची अंतर्गत सजावटीची कामे करण्यात येतील. या इमारतीमध्ये सर्व मजल्यांवर मराठी रंगभूमी संग्रहालय असेल. तळमजल्यावर ६०० प्रेक्षक क्षमतेचे मुख्य सभागृह असेल. तर मोकळ्या जागेत १५० प्रेक्षक क्षमतेचा एक खुला रंगमंच देखील असेल. तालीम कक्ष, विश्रामगृह, कलाकार उपहारगृह, अन्य व्यक्तींसाठी उपाहारगृह, १५० क्षमतेचे वाहनतळ, वाचनालय, बहुउद्देशीय सभागृह आणि पुरातन वस्तू जतन व संवर्धन कार्यशाळा अशा विविध वैशिष्ट्यांचा या इमारतीमध्ये समावेश असेल, अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

ऋषिकेश जोशी यांनी मनोगतात सांगितले, मुख्यमंत्री होण्याआधीपासून श्री. उद्धव ठाकरे यांच्या मनात मराठी नाट्य विश्वाची संकल्पना होती. जगात मानबिंदू ठरेल, अशा स्वरुपाचे हे संग्रहालय असणार आहे. कारण त्यात मराठी नाट्य सृष्टीशी संबंधित साहित्य, छायाचित्रे, संहिता आदींचा समावेश असलेले अभिनव संग्रहालय साकारणार आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख व पर्यटकांसाठी नवे आकर्षण अशा दोन्ही स्वरुपात मराठी नाट्य विश्व आगळेवेगळे ठरेल, असे श्री. जोशी यांनी नमूद केले.

दिलीप प्रभावळकर व सुबोध भावे यांनीही समायोचित मनोगत व्यक्त केले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web