नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाने धडक तोडक कारवाई सुरू ठेवली असून आज ह, आय व ई प्रभागात अनधिकृत इमारतीचे बांधकाम निष्कासीत करण्यात आले. ह प्रभागातील नवापाडा परिसरात पवन चौधरी यांच्या G+5 अनधिकृत इमारतीचे 28 स्लॅब तोडून निष्कासनाची कारवाई सहा.आयुक्त अक्षय गुडधे, सुधीर मोकल आणि त्यांच्या पथकाने केली.
आय प्रभागातील आडीवली ढोकली येथील घनश्याम जयस्वाल व राजू मिसाळ यांच्या G+4 अनाधिकृत इमारतीवर तसेच दावडी गोळवली येथील राजन ठाकूर यांच्या G+7 अनधिकृत इमारतीतील 34 स्लॅब तोडून सहा.आयुक्त संजय साबळे,हेमा मुंबरकर,किशोर ठाकूर,सुहास गुप्ते यांनी त्यांच्या पथकाच्या सहाय्याने निष्कासनाची धडक कारवाई करत अंदाजे 4500 फुट बांधकाम निष्कासीत करण्यात आले.
त्याप्रमाणे ई प्रभागात माणगाव डोंबिवली पूर्व येथील राजू वजे यांच्या G+1 अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर सहा.आयुक्त भारत पवार, सविता हिले, राजेश सावंत यांनी त्यांच्या पथकाच्या सहाय्याने निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली आहे.
अनधिकृत बांधकामाविरुध्द निष्कासनाची मोठी कारवाई आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथक व पोलिसांच्या मदतीने करण्यात येत असून सदर कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे.