डोंबिवलीत दोन सराईत सोनसाखळी चोरांना मानपाडा पोलिसांनी केली अटक

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली – भिवंडीतील दोन तरूण कल्याण-डोंबिवली परिसरात ज्येष्ठ नागरिकांसह पादचारी महिलांना लक्ष्य करून सोनसाखळ्या, मंगळसूत्र, गंठण लांबविण्याचा धंदा मागील अनेक महिन्यांपासून करत होते. या धोघना मोठ्या शिताफीने मानपाडा पोलिसांनि बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून १६ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला.रमेश पालीवाल (३४, रा. पद्मा चाळ, वऱ्हाड देवी, भिवंडी), महेश जठ (रा. लक्ष्मी दर्शन इमारत, कोंबडपाडा, शिवाजी चौक, भिवंडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी मुळचे राजस्थान येथील रहिवासी आहेत. रमेश पालीवाल सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर २९ सोनसाखळी चोरीचे गुन्हे ठाणे, पालघर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. कल्याणमधील खडकपाडा, कोळसेवाडी, बाजारपेठ, डोंबिवलीतील मानपाडा, टिळकनगर, विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत त्यांनी गेल्या काही महिन्यात सोनसाखळी चोरीचे नऊ गुन्हे केले आहेत.
एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात दोन जण दुचाकीवरून सोनसाखळी हिसकावून पळून जात असल्याचे दिसत होते. पोलिसांनी या दुचाकीचा वाहन क्रमांक आणि त्यावरील स्वारांची ओळख पटविली. दोन्ही आरोपी भिवंडीतील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी भिवंडी भागात पंधरा दिवस पाळत ठेवली. विविध वस्त्यांमध्ये आरोपींचा शोध घेतला. या तपासणीतून रमेश पालीवाल, महेश जठ पोलिसांच्या तावडीत सापडले.
चोरी केलेले दागिने दोघे सोनाराना विकत होते. हे दागिने घरातील आहेत असे ते सांगत होते.
पोलिसांनी त्यांच्याकडून १५ लाख २५ हजार रूपये किमतीचे ३०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली होंडा कंपनीची दुचाकी जप्त केली आहे. सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी पाचही पथकांचे कौतुक केले आहे.

मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत वर्दळीच्या ठिकाणी पादचाऱ्यांना लुटणे, महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेण्याच्या घटना वाढल्या होत्या. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, अनिल भिसे, सुनील तारमळे, हवालदार राजेंद्र खिलारे, विजय कोळी , दीपक गडगे, प्रवीण किनरे, महादेव पवार, यल्लप्पा पाटील, प्रशांत वानखेडे, महेंद्र मंझा, अशोक काकोडे, सुशांत तांबे, संतोष वायकर, सोमनाथ टिकेकर, भानुदास काटकर, संजु मिसाळ यांची पाच पथके गेल्या महिन्यापासून मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील कल्याण-शिळफाटा रस्ता, घरडा सर्कल, एमआयडीसी, निवासी विभाग, मानपाडा रस्ता भागात गस्त घालत होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web