नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – स्वदेशी युद्धनौका निर्मितीच्या इतिहासात आज देश एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या दोन आघाडीच्या युद्धनौका प्रोजेक्ट 15B श्रेणीतील मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका ‘सुरत’ , आणि प्रोजेक्ट 17A श्रेणीतील ‘उदयगिरी’, या स्टेल्थ लढाऊ जहाजाचे आज मुंबईतील माझगाव डॉक्स लिमिटेड येथे एकाच वेळी जलावतरण झाले. प्रोजेक्ट 15B श्रेणीतील जहाजे ही मुंबईतील माझगाव डॉक्स लिमिटेड येथे तयार करण्यात आलेली भारतीय नौदलाची अद्ययावत स्टेल्थ मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका आहेत.
संरक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणात या युद्धनौकांचे वर्णन देशाच्या सागरी क्षमता वाढविण्याच्या सरकारच्या अटल वचनबद्धतेचे मूर्त स्वरूप असे केले. रशिया -युक्रेन संघर्ष आणि कोविड-19मुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय येत असताना भारताने ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यावर लक्ष केंद्रित केले. महामारी असूनही जहाज निर्मिती सुरू ठेवून सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत भारतीय नौदलाच्या धोरणात्मक गरजा पूर्ण केल्याबद्दल त्यांनी माझगाव डॉक्स लिमिटेडचे अभिनंदन केले.
या दोन युद्धनौका भारतीय नौदलाच्या शस्त्रागाराचे सामर्थ्य वाढवतील आणि भारताच्या सामरिक सामर्थ्याचे तसेच आत्मनिर्भरतेच्या सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतील,असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले
हिंद-प्रशांत क्षेत्र खुले आणि सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडत असल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी भारतीय नौदलाचे कौतुक केले. “हिंद-प्रशांत क्षेत्र संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे. भारत या क्षेत्रातील एक जबाबदार सागरी भागधारक आहे. क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासाचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन (SAGAR-Security and Growth for All in the Region) शेजाऱ्यांसोबत मैत्री, मोकळेपणा, संवाद आणि सहअस्तित्व या भावनेवर आधारित आहे. त्याच दृष्टिकोनातून भारतीय नौदल आपले कर्तव्य प्रभावीपणे पार पाडत आहे,”असे ते म्हणाले.
हिंद महासागर आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात सतत बदलणारी सुरक्षा परिस्थिती यामुळे येणाऱ्या काळात भारतीय नौदलाला अधिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागू शकते , असे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
जागतिक सुरक्षा, सीमा विवाद आणि सागरी वर्चस्व यामुळे जगभरातील राष्ट्रांना त्यांच्या सैन्याचे आधुनिकीकरण करणे भाग पडत आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्र्यांनी केले. सरकारच्या धोरणांचा फायदा घेऊन क्षमतांचा पुरेपूर वापर करून भारताला स्वदेशी जहाज बांधणी केंद्र बनवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांना केले.
स्वदेशी जहाजे, पाणबुड्या इत्यादींच्या निर्मितीद्वारे स्वावलंबन सुनिश्चित करण्यात भारतीय नौदल नेहमीच आघाडीवर असल्याचे कौतुक राजनाथ सिंह यांनी केले.
नौदलाच्या परंपरेनुसार, नेव्ही वाईव्हज वेलफेयर असोशिएशन(पश्चिम क्षेत्र)च्या अध्यक्षा श्रीमती चारू सिंग आणि माझगाव डॉक्स लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या पत्नी श्रीमती जयश्री प्रसाद यांनी शुभेच्छा देत जहाजांचे अनुक्रमे ‘सुरत’ आणि ‘उदयगिरी’ असे नामकरण केले. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार आणि भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
‘सुरत‘ आणि ‘उदयगिरी‘, यांच्याविषयी
‘सुरत’ ही प्रोजेक्ट 15B या श्रेणीतील चौथी विनाशिका आहे, ज्याची निर्मिती P15A (कोलकाता श्रेणी ) विनाशिकेत महत्त्वपूर्ण बदल करून केली आहे. गुजरातची आर्थिक राजधानी आणि मुंबई पाठोपाठ पश्चिम भारतातले दुसऱ्या क्रमांकाचे व्यावसायिक केंद्र असलेल्या सुरत शहराच्या नावावरून या विनाशिकेचे नाव ठेवण्यात आले आहे. सुरत शहराला समृद्ध सागरी आणि जहाज बांधणीचा इतिहास आहे आणि 16व्या आणि 18व्या शतकात शहरात बांधलेली जहाजे त्यांच्या प्रदीर्घ सेवेसाठी (100 वर्षांपेक्षा जास्त) ओळखली जात होती. सुरत ही विनाशिका ब्लॉक बांधकाम पद्धती वापरून तयार केली गेली आहे, ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या भौगोलिक स्थानांवर नौकेच्या सांगाड्याचे बांधकाम झाले आणि माझगाव डॉक लिमिटेड , मुंबई येथे ते एकत्र जोडले गेले आहे. या श्रेणीतील पहिली विनाशिका 2021 मध्ये कार्यान्वित झाली . दुसऱ्या आणि तिसऱ्या विनाशिकांचे यापूर्वीच जलावतरण झाले असून त्या चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत.
आंध्र प्रदेशातल्या पर्वतरांगांवरून ‘उदयगिरी’ या फ्रिगेट युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे. ही प्रोजेक्ट 17A श्रेणीतील तिसरी फ्रिगेट युद्धनौका असून सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालीसह P17 फ्रिगेट (शिवालिक श्रेणी ) नुसार याची बांधणी केली आहे.’उदयगिरी’ हे पूर्वीच्या लिअँडर क्लास एएसडब्ल्यू फ्रिगेट ‘उदयगिरी’चे नवे रूप आहे, जे 18 फेब्रुवारी 1976 ते 24 ऑगस्ट 2007 या तीन दशकांत आपल्या गौरवशाली सेवेत देशासाठी असंख्य आव्हानात्मक मोहिमांमध्ये सहभागी होते. प्रोजेक्ट 17A कार्यक्रमांतर्गत सात युद्धानौकांपैकी 4 माझगाव डॉक लिमिटेड( एमडीएल) इथे आणि 3 जीआरएसई येथे निर्माणाधीन आहेत. प्रोजेक्ट 17A प्रकल्पातील पहिल्या दोन युद्धानौकांचे 2019 आणि 2020 मध्ये अनुक्रमे एमडीएल आणि जीआरएसई येथे जलावतरण करण्यात आले.
प्रोजेक्ट 15B आणि प्रोजेक्ट 17A या दोन्ही युद्धानौकांची रचना नौदल आरेखन संचालनालयाने (DND) केली आहे, जे देशातील सर्व युद्धनौकांच्या संरचनेचे काम पाहते. कारखान्यात उभारणीच्या टप्प्यात असताना उपकरणे आणि अन्य प्रणालीच्या सुमारे 75% ऑर्डर्स एमएसएमईसह स्वदेशी कंपन्यांना देण्यात आल्या. देशातील ‘आत्मनिर्भरतेचे ‘ हे ठळक उदाहरण आहे.
माझगाव डॉक लिमिटेडविषयी
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL),हा संरक्षण मंत्रालयाचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. सुरुवातीपासून नागरी आणि संरक्षण दोन्ही क्षेत्रात जवळपास 800 जहाजे बांधण्याचा आणि वितरित करण्याचा समृद्ध वारसा या उपक्रमाला आहे. सध्या भारतीय नौदलासाठी तीन मोठे प्रकल्प इथे राबवले जात आहेत ज्यामध्ये विनाशिका, युद्ध्नौका आणि पाणबुड्या यांची निर्मिती विविध टप्प्यांवर आहे. कोविड19 महामारीच्या काळातल्या आव्हानांना सामोरे जात या काळातही माझगाव डॉक लिमिटेडने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.