ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रूग्णांसाठी दंत चिकीत्सकांची सेवा आवश्यक असल्याने दंतचिकित्सक क्षेत्रातील विविध पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण रूग्णालयांपर्यंत पदे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातही दातांवर उपचार मिळतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

दंत चिकित्सक क्षेत्राला उर्जितावस्था येण्यासाठी व धोरण आखण्यासाठी दंत परिषदेने अभ्यासगटाद्वारे शिफारसी शासनास सादर कराव्यात. धोरणात्मक बदल झाल्यास या क्षेत्रास उर्जितावस्था प्राप्त होईल, असे वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्र राज्य दंत परिषदेने कोविड दंत योद्धा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मंत्री राजेश टोपे तर पुरस्काराचे वितरण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, निबंधक शिल्पा परब, डॉ. जगन्नाथ हेगडे, डॉ. अशोक ढोबळे यांच्यासह परिषदेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी मंत्री राजेश टोपे आणि मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे रूग्णांना माहिती व सेवा मिळावी यासाठी मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले. नायर रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ निलम अंधराळे, सेठ नंदलाल धूत रूग्णालयाचे दंत चिकित्सक विभागाचे प्रमुख डॉ हिमांशु गुप्ता यांच्यासह अन्य दंतचिकित्सकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

मंत्री टोपे म्हणाले, दंत चिकित्सकांचे क्षेत्र मर्यादित असतानाही त्यांनी कोरोना काळात कोविड रूग्णांना सेवा दिली. ही अतिशय स्तुत्य बाब आहे. आर्थो डेंटल आणि कॉस्मेटीक डेंटल या नवीन शाखा उदयास येत असून, दंत क्षेत्रात आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. लवकरच मोठी भरती या क्षेत्रात शासनामार्फत केली जाणार आहे. शहरातच नाही तर ग्रामीण भागापर्यंत ही सेवा मिळावी यासाठी चेअर उपलब्ध करून दिले जाणार आणि पदभरती केली जाणार आहे.

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत दंत वैद्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. इंडियन डेंटल असोसिएशन आणि काँन्सिलने आपल्या माध्यमातून सेवा वाढवाव्यात. ‘डेंटल लॅब असिस्टंट’ या नवीन पदासाठी प्रमाणपत्र किंवा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी कार्यक्रम तयार करावा, त्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असेही मंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.

मंत्री अमित देशमुख म्हणाले, कोरोना काळात दंत वैद्यांनी जे योगदान दिले ते कौतुकास्पद आहे. या क्षेत्रात आमुलाग्र बदलासह या क्षेत्राला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासन धोरणात्मक निर्णय घेईल. दंत परिषदेने महाराष्ट्र राज्य देशात दंत क्षेत्रात अग्रगण्य कसा ठरेल यासाठी अभ्यासात्मक अहवाल सादर करावा. परिषदेच्या शिफारशींचा शासन सकारात्मक विचार करून निर्णय घेईल. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही सेवा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web