कल्याण तालुक्यातील सचिन स्टोन क्रशरकडून ५ कोटी ९३ लाखांची वीजचोरी, पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – कल्याण तालुक्यातील फालेगाव येथील सचिन स्टोन क्रशर या खडी केंद्रासाठी तब्बल ५ कोटी ९३ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणले. रिमोटद्वारे वीजवापर नियंत्रित करणारे सर्कीट मीटरमध्ये बसवून गेल्या २९ महिन्यांपासून क्रशरचालकाने ३४ लाख ९ हजार ९०१ युनिट विजेची चोरी केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात क्रशर मालक व चालक असलेल्या पिता-पुत्राविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत गजानन भांबरे आणि सचिन चंद्रकांत भांबरे (राहणार फालेगाव, ता. कल्याण) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. भरारी पथकाने फालेगाव येथील सचिन स्टोन क्रशरच्या (सर्व्हे क्रमांक १४९/१४) मीटरची ५ मे रोजी तपासणी केली. यात मीटरमध्ये छेडछाड केल्याचे व वीज वापराच्या नोंदी संशयास्पद असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळले. त्यामुळे मीटर ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत सखोल तपासणी करण्यात आली. यात मीटरमध्ये काळ्या रंगाची चिकटपट्टी गुंडाळून रिमोट कंट्रोल सर्किट बसवण्यात आल्याचे आढळले. रिमोट कंट्रोलच्या साह्याने हे सर्किट नियंत्रित करून क्रशरच्या प्रत्यक्ष वीजवापराची मीटरमध्ये कमी नोंद होईल, अशी व्यवस्था केल्याचे तांत्रिक विश्लेषणातून निष्पन्न झाले. डिसेंबर २०१९ ते एप्रिल २०२२ दरम्यान वीजचोरीचा हा प्रकार सुरू होता. वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक शिवाजी इंदलकर, उपसंचालक सुनिल थापेकर, कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय सातपुते, शशांक पानतावणे, सुनिल राठोड, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी धनंजय कुटे, सहायक अभियंता अतुल ओव्हळ, हेमंत तिडके, तंत्रज्ञ अरुणा नागरे, प्रफुल्ल राऊत, प्रदीप फरद यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web