कल्याणात पोलिस व केडीएमसीच्या पुढाकाराने हॅपी स्ट्रीट उपक्रम

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – कल्याणकरांसाठी आजाशी सकाळ काहीशी वेगळी आणि भरपूर अशी आनंददायी ठरल्याचे दिसून आले. निमित्त होते ते पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने आणि केडीएमसीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘ हॅपी स्ट्रीट ‘ उपक्रमाचे. कल्याणात पहिल्यांदाच अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात अशा वेगळ्या उपक्रमाचा आनद घेत नागरिक सुखावले असल्याचे दिसून आले आहे.

कल्याण पोलीस परिमंडळ ३ आणि कल्याण डोंबिवली महानरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने या अनोख्या आनंद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना आल्यापासून आपल्या जीवनातील आनंद आणि समधानाची जागा चिंता आणि ताण तणावाने घेतली. गेली २ वर्षे अक्षरशः धुमाकूळ घातलेल्या कोरोनाची परिस्थिती आता बऱ्यापैकी निवळली आहे. मात्र या दोन वर्षात सहन करावा लागणारा ताण तणाव आणि मानसिक थकवा इतका जबरदस्त होता की अद्यापही काही जण त्यातून बाहेर आलेले नाहीत. नेमका हाच धागा पकडून आणि दैनंदिन धकाधकीचे तणावाचे जीवन जगताना स्वच्छंदी जीवन जगले पाहिजे, आनंद उपभोगला पाहीजे या संकल्पनेतून पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने आणि केडीएमसीच्या सहकार्याने वसंत व्हॅली परिसरात हा ‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रम राबवण्यात आला. त्यामुळे वसंत व्हॅली परिसरातील हा रस्ता आज लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, तरुण तरुणी, खेळाडू, डान्सर, गायक आदींनी अक्षरशः फुलून गेला होता.

या उपक्रमादरम्यान या रस्त्यावर ‘नो व्हेइकल झोन’ पाळण्यात आल्याने कर्णकर्कश हॉर्नचा व्यत्यय येत नव्हता. येथे नागरिकांना आपल्यातील सुप्त कलागुण आणि कौशल्यांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. हॅपी स्ट्रीटमध्ये पारंपरिक आणि आधुनिक खेळ, बहारदार नृत्य, गाणी, मर्दानी खेळांचा रोमांच, योग आणि आयुर्वेदातून मिळणारी आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली, नव्या युगाची गरज असलेला सेल्फ डिफेन्स, फेस पेंटिंग, स्ट्रीट पेंटिंग अशी आपल्याला आवडेल ती कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. गाण्यापासून नृत्यापर्यंत, फुटबॉलपासून कराटेपर्यंत आणि झुंबापासून लावणीपर्यंत जे जे करायची इच्छा होती. ते सर्व याठिकाणी मनामुराद आणि स्वच्छंदीपणे तर केलेच. त्याचसोबत स्वतः आनंद उपभोगत इतरांनाही आनंद देण्याची संधी या हॅपी स्ट्रीट उपक्रमाने लोकांना उपलब्ध करून दिली. केवळ मोठे नागरिकच नव्हे तर बच्चे कंपनीलाही मनसोक्त धावण्या- पळण्यासोबतच आवडीचे खेळही खेळता आले.

दैनंदिन धकाधकीचे तणावाचे जीवन जगताना स्वच्छंदी जीवन जगले पाहिजे, आनंद उपभोगला पाहीजे या संकल्पनेतूनपोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने आणि केडीएमसीच्या सहकार्याने वसंत व्हॅली परिसरात हा ‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

विशेष म्हणजे याठिकाणी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार, सचिव संजय जाधव यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी यांच्यासह अनेक उच्च पदस्थ व्यक्तीनी यावेळी उत्स्फूर्त सहभाग घेतलेला पाहायला मिळाला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web