राष्ट्रीय गुप्तचर ग्रीड बेंगळूरू परिसराचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्‌घाटन

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज बेंगळूरू इथे एनएटीजीआरआयडी अर्थात राष्ट्रीय गुप्तचर ग्रीड परिसराचे  उद्‌घाटन केले. या उद्‌घाटन सोहोळ्यात उपस्थितांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले की दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही असे धोरण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पहिल्या दिवसापासूनच स्वीकारले आहे.

हवाला व्यवहार, दहशतवाद्यांना पैसा पुरविणे, बनावट चलन, अंमली पदार्थ, बॉम्बस्फोटाची धमकी, बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी आणि दहशतवादाशी संबंधित इतर कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक राष्ट्रीय माहितीकोष विकसित करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. महत्त्वाच्या माहितीसंदर्भातील अडथळे दूर करण्यात आल्यामुळे गुप्तचर यंत्रणा तसेच कायदेविषयक संस्था आता या माहितीचा उपयोग करून घेऊ शकतील असे ते म्हणाले. डाटा अनॅलिटिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान यांच्या मदतीमुळे आता या संस्थांच्या सध्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठे परिवर्तन व्हायला हवे. एनएटीजीआरआयडी माहितीच्या विविध स्रोतांना जोडण्याची जबाबदारी पार पाडेल असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

एनएटीजीआरआयडीच्या प्रणालीचे सतत आधुनिकीकरण होण्याची यंत्रणा त्यात समाविष्ट असायला हवी अशी अपेक्षा शाह यांनी व्यक्त केली. देशात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांच्या कार्यपद्धतीच्या माहितीचा कोष निर्माण करणारा एक अभ्यासगट एनएटीजीआरआयडी या संस्थेत असायला हवा असे ते म्हणाले.

या प्रणालीचा वापर करणाऱ्या संस्थांनी सावधानता आणि दक्षता बाळगावी आणि केवळ योग्य कारणांसाठीच या माहितीचा वापर करावा असे त्यांनी  वापरकर्त्या संस्थांना सांगितले. या प्रणालीतून प्राप्त माहितीचा वापर शक्य तितक्या अधिक प्रमाणात त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी केला जाईल हे देखील या संस्थांनी सुनिश्चित करावे असे ते म्हणाले. माहितीची गोपनीयता  आणि सुरक्षितता ही अत्यंत गंभीर बाब आहे यावर जोर देत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी, या प्रणालीच्या माध्यमातून कोणत्याही वेळी कोणत्याही नागरिकाची वैयक्तिक माहिती मिळविण्याचा बेकायदेशीर मार्ग उपलब्ध नसेल याची सुनिश्चिती करण्यासाठी आवश्यक नियम लागू करण्यात आले आहेत असे सांगून उपस्थितांना आश्वस्त केले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web