नेशन न्युज मराठी टिम.
कल्याण- इंग्रजी सोपी भाषा आहे. इंग्रजी भाषेची भीती बाळगू नका. गोरगरिबांची, बहुजन समाजाची, झोपडपट्टीतील मुले फार गुणवान असतात. फक्त त्यांच्याकडे आत्मविश्वास कमी असतो. फक्त आत्मविश्वास ठेवायचा-घाबरायचे नाही. गुणवत्ता कुणाची मक्तेदारी नाही हे लक्षात ठेवा, असे प्रतिपादन प्रख्यात इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी यांनी आंबिवली येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने बुधवारी आयोजित केलेल्या महामानव संयुक्त जयंती उत्सवात कोकाटे बोलत होते.
या कार्यक्रमाला रिपाईचे मोहोने शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड, माजी नगरसेविका संगीता सिद्धार्थ गायकवाड, पत्रकार सिद्धार्थ गायकवाड, ज्येष्ठ पदाधिकारी दासू ठोंबे, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष उत्तम जोगदंड, भीमराव डोळस, जयंत सोनावणे, राजू रणदिवे, बाबा रामटेके, लक्ष्मी अहिरे, दिनेश जाधव, संभाजी ब्रिगेडचे कल्याण महानगर अध्यक्ष अशोक गवळी आदी आवर्जून उपस्थित होते. आपल्या भाषणात कोकाटे पुढे म्हणाले की, ‘आज जे मराठी भाषेच्या नावाने गळा काढतात, इंग्रजीला विरोध करतात त्यांची मुले मात्र इंग्रजी माध्यमात शिकतात. त्यामुळे बहुजन मुलामुलींनी इंग्रजी शिकले पाहिजे. मराठी आपली आई आहे तर इंग्रजी मावशी आहे’, असे ते म्हणाले.
शिवाजी महाराजांनी स्वराज्यात कधी भेदभाव केला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमते विरोधात लढा दिला. त्यांनी समतेचा आग्रह धरला. जोपर्यंत चुकीच्या धार्मिक श्रद्धा नष्ट होणार नाहीत तोपर्यंत देशात समग्र क्रांती येणार नाही असे बाबासाहेबांचे मत होते. शिवराय-भिमराय हे विज्ञानवादी असल्याचे श्रीमंत कोकाटे यांनी स्पष्ट केले. शिवरायांनी महिलांना समानतेची वागणूक दिली. शत्रूच्या स्त्रियांचा देखील सन्मान करण्याची शिकवण दिली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात महिलांच्या प्रतिष्ठा राखली जाईल याची तरतूद केली. मुलीदेखील मुलांप्रमाणेच वंशाचा दिवा आहेत हा विचार तथागत गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी मांडल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
स्त्रियांची प्रतिष्ठा राखणे, स्त्री-पुरुषांची विक्री बंद करणे, वेठबिगारी-बाल मजुरी नष्ट करणे, असे शिवराय-भिमराय यांच्यातील अनेक समान दुवे डॉ. कोकाटे यांनी यावेळी कथन केले. शिवरायांच्या प्रशासनात सर्व जातीधर्माचे लोक होते तर बाबासाहेबांनी सर्वांना धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिला. आपला देश केवळ एका धर्माचा नाही, एका जातीचा नाही तर सर्वांचा आहे. म्हणून संविधानाच्या प्रस्ताविकेत ‘आम्ही, भारताचे लोक’ असा उल्लेख असल्याचे सांगत संविधानाने प्रत्येक भारतीयाला आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार दिल्याचे कोकाटे म्हणाले.
देश परदेशात ठिकठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. कोलंबिया विद्यापीठातही त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. बाबासाहेबांचा जगातील पहिला पुतळा ९ डिसेंबर १९५० रोजी मराठा नेते भाई माधवराव बागल यांनी बाबासाहेब हयात असताना कोल्हापूर येथील बिंदू चौकात उभारला. कारण बाबासाहेबांनी सर्व जाती-धर्मीयांच्या कल्याणाचा विचार केला. देशात समता आणायची असेल, जाती-धर्मातील भेद संपवायचा असेल तर खरा इतिहास पाठ्यपुस्तकातून शिकवला गेला पाहिजे. आज पाठयपुस्तकात ८० टक्के खोटा इतिहास शिकवण्यात येत असल्याचा पुनरुच्चार कोकाटे यांनी यावेळी केला. तथागत गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी जगले. गरीब, उपेक्षित, वंचित समाजाच्या कल्याणासाठी झटले. त्यांचा कायम जयजयकार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
संगीता सिद्धार्थ गायकवाड, पत्रकार सिद्धार्थ गायकवाड, श्रीकांत घोडके, रवि खळे, विल्सन काळपुंड यांच्या प्रमुख संयोजनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.