महावितरणची वीज चोरांविरूद्ध धडक मोहीम, टिटवाळ्यात ३९० तर शहापुरात ५४० आकडे बहाद्दरांवर कारवाई

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण– महावितरणच्या कल्याण मंडल दोन अंतर्गत वीज वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात येत आहे. यात अनधिकृतपणे वीजवापर करणाऱ्यांना विशेष लक्ष करण्यात येत आहे. या मोहिमेत टिटवाळा परिसरात ३९० आकडे (हूक) हटवण्यात आले तर ४० जणांवर वीज कायदा कलम १३५ नुसार वीजचोरीची कारवाई करण्यात आली. तर शहापूर तालुक्यात सोमवारी (२५ एप्रिल) एका दिवसात ५४० आकडेबहाद्दरांवर कारवाई करत वीज चोरीसाठीचे साहित्य जप्त करण्यात आले.

सध्याच्या वीज टंचाईच्या पार्श्वभूमिवर अनधिकृतपणे वीजवापर करणाऱ्यांमुळे वीज वितरण यंत्रणेवर येणारा ताण कमी व्हावा, यासाठी आकडेबहाद्दरांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार टिटवाळा उपविभागातील खडवली, दाणगाव, वासुंद्री, पळेगाव परिसरात २१ एप्रिलपासून आतापर्यंत अनधिकृतपणे वीजवापर करण्यासाठी वीजवाहक तारांवर टाकलेले ३९० हटवून संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. तर तपासणीत वीजचोरी आढळलेल्या ४० ग्राहकांना चोरीच्या विजेचे बिल व दंडाची रक्कम भरण्याबाबत कळवण्यात आले आहे. विहित मुदतीत ही रक्कम न भरणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे.

शहापूर उपविभागातील कसारा व किन्हवली परिसरात सोमवारी एकाच दिवशी अनधिकृत वीजवापर करणारे ५४० आकडे हटवण्यात आले. तर वीजचोरी आढळलेल्या १७ जणांवर कलम १३५ नुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत शहापूर उपविभागाने यापूर्वी ४४१ आकडे हटवले आहेत. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता राजीव रामटेके यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंते अविनाश कटकवार व गणेश पवार, अधिकारी, शाखा अभियंते, जनमित्र व कर्मचारी या मोहिमेत सहभागी होते. ही मोहीम अधिक तीव्रपणे राबवण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीत विजेचा अनधिकृत वापर खपवून घेतला जाणार नसल्याची माहिती कार्यकारी अभियंता रामटेके यांनी दिली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web