आरोग्य विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासीयता योजनेस प्रारंभ

नेशन न्यूज मराठी टीम.

नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय व तृतीय शैक्षणिक वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांकरीता ग्रीष्मकालीन आंतरवासियता – २०२२ योजनेस नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १९ एप्रिल २०२२ पर्यंत आहे.

विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आंतरवासियता पूर्ण करता यावी यासाठी विद्यापीठाने कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या संकल्पनेतून ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेस (Summer Internship Program) प्रारंभ केला आहे. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबर संशोधन, वैज्ञानिक प्रयोग आणि इतर विद्वत्तापूर्ण तपासांमध्ये सैद्धांतिकज्ञान आणि विद्यार्थ्याचे व्यावहारिक कौशल्ये विकसित होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. संस्थेमध्ये वास्तविक जीवनाचा अनुभव व व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यास मदत व्हावी हा उद्देश समोर ठेवून सदर योजना विद्यापीठाने सुरू केली आहे.

विद्यापीठातर्फे सुरु करण्यात आलेल्या ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेत विद्यार्थ्यांना संशोधन, क्लिनिकल रिसर्च, निसर्गोपचार, योगा, आयुर्वेद, पंचकर्म, वैद्यकीय बायोमेट्रीक वैद्यकीय तंत्रज्ञान, सामाजिक बांधिलकी, नीतिशास्त्र, पर्यावरणीय आरोग्य विज्ञान, मेडिकल मॅनेजमेंट, इपिडेमोलॉजी, बायोस्टॅटिटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोइफोरमेटिक्स, रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईक यांच्याशी संयमाने संवाद करण्याची पद्धती, सामाजिक आरोग्य व शिक्षण, धोरण आणि व्यवस्थापन, वैद्यकीय शिस्त, मानसोपचाराचे पैलू आणि सामाजिक उपयुक्तता, मानसोपचार पोषण आणि आहारशास्त्र, बायोमेडिकल इंजिनिअरींग, वैद्यकीय तंत्रज्ञान पारंपरिक आरोग्य सेवा प्रणाली, वृद्धत्व रोखण्यासाठी आणि निरोगी जीवनासाठी सर्वांगिण दृष्टीकोन, इलेक्ट्रॉनिक वैद्यकीय रेकॉर्ड, ग्रामीण भागातील लोकसंख्या व आरोग्य समस्या समाजात रक्तदानाविषयी जनजागृती, रक्तपेढी, आरोग्य क्षेत्रात नॅनो टेक्नोलॉजीचा वापर, अनुवंशिक रोगांबाबत समुपदेशन आदींची माहिती व शिक्षण यामाध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे प्रथम द्वितीय व तृतीय वर्षापर्यंतचे विद्यार्थ्यांना ग्रीष्मकालीन आंतरवासियता प्रवेशासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. योजनेत निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रति आठवडा रु. दोन हजार पाचशे इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. या योजनेचा कालावधी सुमारे दोन ते चार आठवडे इतका असणार आहे. विद्यापीठाने निर्देशित केलेल्या समर इंटर्नशिप प्रोग्रॅम सेंटरवर ग्रीष्मकालीन आंतरवासीयता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून ऑनलाइन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनांचा कालावधी शुल्क व अधिक माहिती विद्यापीठाच्या www.muhs.ac.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने अधिसूचनेत दिलेल्या अटी व शर्तीस अधिन राहून दि. १९ एप्रिल २०२२ पर्यंत विद्यापीठाकडे अर्ज सादर करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संकुल विभागास ऑनलाईन ieh@muhs.ac.in  ई-मेल पत्त्यावर किंवा दूरध्वनी क. 0253 – 2539156 या क्रमांकावर संपर्क साधावा, विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील अधिष्ठाता, प्राचार्य व महाविद्यालय प्रमुखांनी विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनांची माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागात प्रसिद्ध करावी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ग्रीष्मकालीन आंतरवासियता योजनेबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे विद्यापीठाकडून आवाहन करण्यात येत आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web