महाराष्ट्रातील तीन कलाकारांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली– प्रसिध्द गायक सुरेश वाडकर ,नाटककार राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशीया महाराष्ट्रातील कलाकारांना शनिवारी उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या नायडू  यांच्या हस्ते संगीत नाटक  अकादमी  पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित शानदार कार्यक्रमात महाराष्ट्रातील तीन कलाकारांसह देशभरातील  कलाकारांना वर्ष २०१८ चे संगीत नाटक अकादमी  आणि वर्ष २०२१ चे ललीत कला अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी .किशन रेड्डी संगीत नाटक अकादमी तथा ललित कला अकादमीच्या अध्यक्ष उमा नंदुरी यावेळी उपस्थित होत्या.

 केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या कार्यक्रमात   महाराष्ट्रातील तीन कलाकारांसह देशभरातील ४० कलाकारांना वर्ष २०१८ चे नाटय अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले.१ लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 सुगम संगीत क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांना यावेळी गौरविण्यात आले. अनेक सुपरहिट गाण्यांमुळे चाहत्यांच्या मनावर गारूड करणारे प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांना सुगम संगीतातील योगदानासाठी या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. सुरेश वाडकर यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन केले आहे. यासोबतच त्यांनी भोजपुरी, मल्याळी, कोकणी, गुजराती , बंगाली आणि सिंधी चित्रपटांमधून तसेच उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत.

नाटय क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द नाटककार राजीव नाईक यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. नाटककार आणि कथाकार म्हणून राजीव नाईक यांन मराठी साहित्यात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. श्री नाईक यांनी लिहीलेली ‘अनाहत’, ‘वांधा’, ‘अखेरचं पर्व’, ‘साठेंच काय करायचं?’ आदि नाटके प्रसिध्द आहेत. श्री नाईक यांनी लिहिलेली ‘नाटकातलं मिथक’, ‘खेळ नाटकाचा’, ‘नाटकातला काळ आणि अवकाश’, ‘न नाटकाचा’ आदि पुस्तके नाटकांच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरली आहेत.

 नाटय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी  सुहास जोशी यांना गौरविण्यात आले. अनेक नाटक, ‍ चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  मराठी ,हिंदी, इंग्रजी सिनेसृष्टी तसेच नाटय क्षेत्रात त्यांनी  चरित्र अभिनेत्री म्हणून अनेक भूमिका वठविल्या   आहेत.राष्ट्रीय नाटय विद्यालयमधून त्यांनी अभिनयाचे  शिक्षण पूर्ण केले असून  महाविद्यालयीन दिवसापासूनच त्यांनी अनेक व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांमध्ये अभिनय केला.

 प्रसिध्द तबलावादक  झाकीर हुसेन यांना  वर्ष २०१८ ची संगीत नाटक अकादमीची फेलोशिफ जाहीर झाली  होती. आजच्या पुरस्कार वितरण समारंभात काही अपरीहार्य कारणास्तव  ते उपस्थित राहून शकले नाहीत.    या कार्यक्रमात वर्धा येथे जन्मलेले  प्रसिध्द  शास्त्रीय गायक मणी  प्रसाद, मुंबईत जन्मलेल्या अलमेलू मणी  यांना कर्नाटक संगीतातील योगदानासाठी  आणि  मुंबईत जन्मलेले  दीपक मुजुमदार यांना भरतनाटयम क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.   

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web