नेशन न्युज मराठी नेटवर्क.
गोवा- आयएनएएस स्क्वाड्रन 316 या भारतीय नौदलाच्या पी- 8आय विमानांच्या दुसऱ्या तुकडीचा आज नौदलाच्या ताफ्यात एका दिमाखदार सोहळ्यामध्ये समावेश करण्यात आला. गोव्यामध्ये आयएनएस हंसा येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नौदलप्रमुख ऍडमिरल आर हरीकुमार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाला संबोधित करताना आर हरीकुमार म्हणाले, “हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारत सर्वाधिक पसंतीचा सुरक्षाविषयक भागीदार आहे, ज्यातून आपल्या देशाची या प्रदेशातील प्रभावी सामरिक भूमिका प्रतिबिंबित होत आहे आणि या पल्ल्याचा आणखी विस्तार करण्याची गरज आहे. भारतीय नौदल यासाठी वचनबद्ध आहे आणि या उद्देशाचा पाठपुरावा करत आहे. आयएनएएस 316 चा ताफ्यात समावेश झाल्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा आणि टेहळणीमध्ये वाढ करण्याच्या दिशेने आणखी एक मोठा टप्पा आपण सर केला आहे.”
आयएनएस 316 चे नाव जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या उडणाऱ्या आणि महाकाय पंख असलेल्या कॉन्डर्स या पक्ष्याच्या नावावरून ठेवले आहे. महाकाय निळ्याशार समुद्रावर शोध घेण्याची क्षमता त्यातून प्रतीत होत आहे. अतिशय उच्च घ्राणेंद्रिय क्षमता, ताकदवान आणि अणुकुचीदार नखे आणि कमालीचे विशाल पंख यासाठी कॉन्डर्स ओळखले जातात. या पक्ष्यांच्या सामर्थ्याप्रमाणे या विमानांची तुकडीही सामर्थ्याचे प्रतीक आहे आणि विविध प्रकारच्या भूमिका बजावू शकते.
या तुकडीमध्ये बोईंग पी- 8आय विमानांचा समावेश आहे. ही विमाने अनेक प्रकारच्या भूमिकेसाठी सक्षम आहेत. सागरावर दूरवर उड्डाण करण्याची क्षमता, पाणबुडीविरोधी युद्धप्रणाली ही या विमानांची वैशिष्ट्ये आहेत. या प्रणालीमध्ये विमानातून जहाजावर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि पाणबुडीविरोधी टॉरपिडो( पाणतीर) यांचा समावेश आहे. युद्धामध्ये संपूर्ण चित्र बदलण्याची क्षमता असलेली ही विमाने सागरी टेहळणी आणि हल्ला, इलेक्ट्रॉनिक युद्ध मोहीमा, शोध आणि बचाव कार्य, हल्ला करण्यासाठी शस्त्रप्रणाली असलेल्या भागाला लक्ष्याची माहिती पुरवणे, भारतीय हवाई दलाला महत्वपूर्ण टेहळणीची माहिती देणे आणि हिंदी महासागर क्षेत्रात शत्रूची जहाजे आणि पाणबुड्यांचा शोध घेणे आणि निष्प्रभ करणे अशा अनेक प्रकारच्या भूमिका बजावू शकतात. हिंदी महासागर क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानाचा सामना करणे, शोध घेणे आणि नष्ट करणे या उद्देशाने ही चार पी-8आय विमाने खरेदी करून त्यांचा समावेश या तुकडीत करण्यात आला आहे. 30 डिसेंबर 2021 पासून या विमानांचे हंसा येथून परिचालन करण्यात येत आहे आणि या विमानांमध्ये नौदलाच्या जमिनीवरील आणि सागरी या दोन्ही मोहिमांमध्ये सहभागी होण्याची क्षमता आहे.
अमित मोहपात्रा यांच्याकडे आयएनएएस-316 या तुकडीची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली आहे जे स्वतः अतिशय निष्णात बोईंग पी- 8आय वैमानिक आहेत आणि या विमानांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. आयएल 38 आणि डॉर्निअर 228 या विमानांच्या उड्डाणाचादेखील त्यांना अनुभव आहे आणि त्यांनी आयएनएस बारटंग आणि आयएनएस तरकश यांची धुरा देखील यशस्वीरित्या सांभाळली आहे.