नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई – सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे तेथील ‘ई लायब्ररी’सह समृध्द ग्रंथालय व इतर सुविधांमुळे देशातील एक उत्कृष्ट स्मारक म्हणून नावाजले जात आहे. हे स्मारक बाबासाहेबांच्या ज्ञानसूर्य उपमेला साजेसे असावे व येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला ज्ञानसंपदेचा वारसा जोपासला जावा या उद्देशाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आगळेवेगळे कार्यक्रम राबवित “जागर 2022” हा जयंती महोत्सव साजरा केला जात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम आता पूर्ण झाले असून हा जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात संपन्न होत आहे. या महोत्सवामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करून बाबासाहेबांच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाला वैचारिक आदरांजली वाहिली जात आहे व विचारांचा जागर केला जात आहे.
* 30 मार्च 2022 रोजी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. सुखदेव थोरात हे ‘डॉ. बाबासाहेब आंबे़डकर यांचे आर्थिक विकास संबंधित विचार आणि त्यांचे वर्तमानकाळातील महत्व’ या विषयावर माहितीपूर्ण भाष्य करणारा आहेत.
* 3 एप्रिल रोजी मुंबई विद्यापिठाचे लोककला विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांचे ‘आंबेडकरी चळवळ आणि लोककला’ या विषयावर व्याख्यान असणार आहे.
* 5 एप्रिल रोजी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे हे ‘भारतातील प्रबोधनाच्या चळवळी’ या विषयावर माहितीपूर्ण संवाद साधणार आहेत.

* 6 एप्रिल रोजी दै. लोकसत्ताचे संपादक व विचारवंत श्री. गिरीश कुबेर हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : अर्थतज्ज्ञ’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
* 07 एप्रिल रोजी सुप्रसिध्द लेखक व ‘चला हवा येऊ द्या मधील गाजलेले पत्रलेखक श्री. अरविंद जगताप ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या विषयावर संवाद साधणार आहेत.
* 11 एप्रिल रोजीच्या महात्मा फुले जयंती दिनाचे औचित्य साधून त्याच्या पूर्वसंध्येला 10 एप्रिल रोजी नामवंत साहित्यिक, व्याख्याते श्री. हरी नरके हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेतून महात्मा फुले यांची विचारक्रांती’ या विषयावर विचार मांडणार आहेत.
* 13 एप्रिल रोजी वाचन संस्कृतीचे महत्व अधोरेखीत करीत नव्या पिढीचे युवक ‘आम्ही वाचलो – तुम्हीही वाचा’ या शिर्षकांतर्गत सुसंवाद साधणार आहेत. याशिवाय दि. 11 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारांवर आधारित आयोजित करण्यात येणा-या चित्रकला स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन दि. 14 एप्रिल रोजी जयंती उत्सवानिमित्त स्मारक सभागृहात प्रदर्शित केले जाणार आहे.
“जागर 2022” शिर्षकांतर्गत हे कार्यक्रम सायं. 7 वा. सेक्टर 15 ऐरोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक याठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वैचारिक जागर करून भव्यतम स्वरुपात साजरी व्हावी व यामधून ज्ञानसूर्य बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला विचारशील आदरांजली अर्पण केली जावी या भूमिकेतून नवी मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण पंधरवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून याप्रसंगी नागरिकांनी बाबासाहेबांविषयीचा मनातील आदरभाव मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्यक्त करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.